हायवे दुरवस्थेला कंत्राटदार जबाबदार!
By Admin | Published: August 23, 2016 05:50 AM2016-08-23T05:50:08+5:302016-08-23T05:50:08+5:30
सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर्स प्रा.लि. आणि महावीर इन्फ्रास्ट्रक्चर्स प्रा.लि.या दोन्ही कंत्राटदार कंपन्या अपयशी ठरलेल्या आहेत.
अलिबाग : गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या ८२ किमी अंतराच्या टप्प्याच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण करण्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नियुक्त केलेले सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर्स प्रा.लि. आणि महावीर इन्फ्रास्ट्रक्चर्स प्रा.लि.या दोन्ही कंत्राटदार कंपन्या अपयशी ठरलेल्या आहेत. येत्या २९ आॅगस्टपूर्वी या महामार्गाच्या टप्प्याची दुरु स्ती त्यांनी तत्काळ करावी, तसेच या महामार्गाच्या टप्प्यात येथून पुढे होणारे वाहनांचे अपघात आणि त्यातील मानवी हानीस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास जबाबदार धरून पुढील कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी गोवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अभियंता प्रशांत फेंगडे यांना दिला आहे. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात गोवा महामार्गाविषयक विशेष बैठक झाली. त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला.
महामार्गाच्या चौपदरीकरणाकरिता आवश्यक भूसंपादनाचे काम रायगड जिल्हा प्रशासनाने पूर्ण करून देऊनही नियोजित कालावधीत या टप्प्याचे चौपदरीकरणाचे काम पूर्ण करण्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नियुक्त केलेले सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर्स प्रा.लि. आणि महावीर इन्फ्रास्ट्रक्चर्स प्रा.लि.या दोन्ही कंत्राटदार कंपन्या अपयशी ठरलेल्या आहेत. त्यांना आतापर्यंत सरकारने वेळोवेळी मुदतवाढ देऊनही चार ते पाच वेळा त्यांनी मुदतीत महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण केलेले नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतलेल्या बैठकीअंती ५४० कोटी रुपये उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी या महामार्गाचा सातत्याने अहवाल घेत आहेत. अशा परिस्थितीत महामार्ग प्राधिकरण व कंत्राटदार कंपन्या हा विषय गांभीर्याने घेत नाहीत, हे योग्य नसल्याचेही मेहता यांनी नमूद केले.
गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या या ८२ किमी अंतराच्या टप्प्यापैकी केवळ २० किमी अंतराचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती प्राधिकरणानेच माहितीच्या अधिकारात दिल्याचे सांगून याबाबतच्या अक्षम्य दिरंगाईवर पेणचे आमदार धैर्यशील पाटील यांनी प्राधिकरणाचे अधिकारी व कंत्राटदार यांना या बैठकीत फैलावरच घेतले.
।२९ आॅगस्टपूर्वी खड्डे भरणार
गणेशोत्सवापूर्वी म्हणजे २९ आॅगस्टपूर्वी सध्याची महामार्गाची दुरवस्था खड्डे भरुन दूर करण्याकरिता आम्ही एकूण आठ अन्य खाजगी कंपन्या नियुक्त केल्या असून त्याच्या माध्यमातून पेव्हर ब्लॉक लावून गोवा महामार्ग गणपतीपूर्वी बिनधोक करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे गोवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अभियंता प्रशांत फेंगडे यांनी सांगितले.पुणे येथील नवीन कंपनीच्या माध्यमातून पावसाळ््यानंतर चौपदरीकरणाचे काम सुरु होवून पळस्पा ते इंदापूर या ८२ किमीच्या चौपदरीकरणाचे काम डिसेंबर २०१७ पर्यंत पूर्ण करू, अशी ग्वाही फेंगडे यांनी दिली.