‘कंत्राटदार धार्जिणे प्रकल्प यापुढे नाही’
By admin | Published: June 19, 2015 02:46 AM2015-06-19T02:46:24+5:302015-06-19T02:46:24+5:30
यापुढे महाराष्ट्रात पाण्यासाठी कंत्राटदार धार्जिणे मोठे प्रकल्प होणार नाहीत. ‘जलयुक्त शिवार’ ही भक्कम लोकवाटा असलेली राज्यातील सर्वात
लातूर : यापुढे महाराष्ट्रात पाण्यासाठी कंत्राटदार धार्जिणे मोठे प्रकल्प होणार नाहीत. ‘जलयुक्त शिवार’ ही भक्कम लोकवाटा असलेली राज्यातील सर्वात मोठी पाणीदार योजना यशस्वी झाली आहे. यामुळे सहा हजार गावांत कोट्यवधी शेतकऱ्यांच्या शिवारात यंदा पाणी थांबेल. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी उजनी (ता. औसा, जि. लातूर) येथे दिली.
जलयुक्त शिवार योजनेंतर्गत झालेल्या विविध कामांच्या पाहणी दौऱ्यात ते बोलत होते. प्रारंभी फडणवीस यांनी औसा तालुक्यातील विविध कामांची पाहणी केली. ते म्हणाले की, एखादी योजना लोकांनी महत्त्व ओळखून केल्यास काय चमत्कार होतो, हे ‘जलयुक्त शिवार’ च्या कामांमधून पहायला मिळते. सहा हजार गावांत जलक्रांती झाल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
जलयुक्त शिवारसाठी पुरस्कार
सामान्यांच्या सहभागातून राज्याच्या जिल्ह्याजिल्ह्यात उभे राहिलेल्या जलयुक्त शिवार अभियानात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी गावे, संस्था, शासकीय अधिकारी आणि व्यक्तींना पुरस्कार देण्याची योजना लवकरच जाहीर केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे सांगितले.