ठेकेदारांची मनमानी, नगरसेवकांची खाबूगिरी

By admin | Published: July 15, 2017 02:59 AM2017-07-15T02:59:57+5:302017-07-15T02:59:57+5:30

डहाणू नगरपरिषद प्रशासनाच्या सुस्त व उदासीन कारभारामुळे डहाणू शहरात कोटयावधींची विकासकामे अर्धवट स्थितीत आहेत

Contractors 'arbitrariness, corporators' scandal | ठेकेदारांची मनमानी, नगरसेवकांची खाबूगिरी

ठेकेदारांची मनमानी, नगरसेवकांची खाबूगिरी

Next

शौकत शेख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
डहाणू : डहाणू नगरपरिषद प्रशासनाच्या सुस्त व उदासीन कारभारामुळे डहाणू शहरात कोटयावधींची विकासकामे अर्धवट स्थितीत आहेत. शासनाच्या विविध योजनेतून मंजूर झालेली विकासकामे नगरपरिषदेच्या आशिर्वादाने ठेकेदार आपल्या सोयीनुसार करीत असल्याने पुरती गैरसोय झाली आहे. त्यातच या विरोधात नगरसेवक ब्र सुद्धा काढत नसल्याने त्यांच्यात साटेलोट आहे की, काय अशी परिस्थिती आहे.
चौकशीच्या विळख्यात अडकलेल्या डहाणू नगरपरिषदेची लोकसंख्या ६० हजार आहे. पर्यटनाच्या दृष्टीने मिनीगोवा भासणाऱ्या या गावात पर्यटन विकासा अंतर्गत तलाव, रस्ते, पथदिवे, सुशोभिकरणाचे काम सुरु करण्यात आले होते. त्यावर आतापर्यंत चाळीस लाख रुपयां पेक्षा अधिक खर्च करण्यात झाला आहे. परंतु, गेल्या दीड, दोन वर्षापासून निधी उपलब्ध असतांनाही काम बंद आहेत. येथील प्रभूपाडा, आगार येथे स्मशानभुमीचे काम अद्याप सुरु करण्यात आलेले नाही.
विशेष म्हणजे डहाणूतील रस्त्यांवर बसणाऱ्या मासळी विक्रेत्या महिलांसाठी नॅशलन फिशरीस डेव्हलपमेंट बोर्ड, हैद्राबाद यांच्या कडून महाराष्ट्र राज्य मत्स्य उद्योग महामंडळ यांच्या मार्फत डहाणू लोणीपाडा येथे अद्ययावत वातानुकुलीत मासळीमार्केट बांधण्यात आले आहे. परंतु गेल्या दोन वर्षापासून ते अपूर्ण असल्याने ते जूगरी तसेच दारुपिणाऱ्याचा अड्डा बनले आहे. डहाणू शहरातील लोकांना पूरेसे पाणी मिळावे म्हणून शासनाने चाळीस कोटी रूपयांची सुजल निर्मल पाणी पूरवठा योजना मंजूर दिली. परंतु मुदतवाढ देऊनही पूरेशा प्रमाणात काम झालेले नाही. पालिका प्रशासन याबाबतीत ठोस निर्णय घेत नसल्याने ही योजना बारगळणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान, शहरासाठी शासनाने स्वतंत्र अग्निशमन दलासाठी लाखोचा निधी दिला आहे. त्यासाठी फायर ब्रिगेडचे वाहन असले तरी ते ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग, कार्यालय व सोयी-सुविधांची अद्याप कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. तसेच वारंवार सुचना देऊनही घराघरातून निघणारा घनकचऱ्यासाठी डहाणू पालिकेकडे डंपिंग ग्राऊंड नसल्याने सध्या मिळेल त्या जागेवर कचरा टाकला जात आहे.
विशेष म्हणजे डहाणू नगरपरिषद प्रशासनाच्या नियोजनशुन्य कारभारामुळे वर्षभरात ओव्हर बजेट कामे केली जात असल्याने पालिकेच्या तिजोरीवर त्याचा भार पडत आहे. परिणामी वार्षिक काम करणाऱ्या ठेकेदारांना त्यांच्या बिलांसाठी सहा, सहा महिने वाट पहावी लागते. तर पालिकेची आर्थिक परिस्थिती दयनिय असतांना देखील पालिकेने वर्षभरापूर्वी डहाणू स्टेशन जवळचे स्वत:चे कार्यालय सोडून दरमहा ७५ हजार भाडे असलेल्या इमारतीत कार्यालय स्थलांतर केल्याने ही दिवाळखोरी कुणासाठी आणि का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
‘अपयशाचे सव्वा वर्ष’
तलाव, रस्ते, पथदिवे, सुशोभिकरणाचे कामावर अद्याप चाळीस लाखांपेक्षा जास्त निधी खर्ची पडला आहे. पाणी योजनेचे बारा वाजले असून डंपिंग ग्राऊंड नसल्याने शहराची कचरा कुंडी बनली आहे.मात्र, मुख्याधिकारी विनोड डवले म्हणतात की, मी येऊन फक्त सव्वा वर्ष झाला आहे. तसेच मी पदभार स्विकारल्यापासून अनेक विकासकामे सुरु असल्याचेही ते सांगतात. आता मात्र शहराच्या बकाल अवस्थेला कुणाची कारकीर्द जबाबदार आहे असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

Web Title: Contractors 'arbitrariness, corporators' scandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.