माझ्याविरुद्धचे आरोप हा तर ठेकेदारांचा कट!
By admin | Published: June 28, 2015 02:10 AM2015-06-28T02:10:07+5:302015-06-28T02:10:07+5:30
महिला आणि बालविकास मंत्रालयावरील ठेकेदारांच्या लॉबीचे वर्चस्व संपविण्याचा प्रयत्न केल्यानेच आपल्याला भ्रष्टाचाराच्या आरोपात गोवण्याचा प्रयत्न होत आहे,
नवी दिल्ली: महिला आणि बालविकास मंत्रालयावरील ठेकेदारांच्या लॉबीचे वर्चस्व संपविण्याचा प्रयत्न केल्यानेच आपल्याला भ्रष्टाचाराच्या आरोपात गोवण्याचा प्रयत्न होत आहे, असा दावा २०६ कोटी रुपयांच्या खरेदी घोटाळ्यात अडकलेल्या महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी केला.
आरोप लावणाऱ्यांनी ते सिद्ध करणारे ठोस पुरावेही सादर केले पाहिजे, असेही आव्हान त्यांनी दिले.
पुरावे कुठे आहेत? असा सवाल करून विभागाने कुठल्याही कार्यपद्धतीकडे डोळेझाक केलेली नाही असा दावा मुंडे यांनी केला. लंडन येथून एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी उपरोक्त भूमिका मांडली.
महिला व बालकल्याण विभागात ठेकेदारांची एक मोठी लॉबी कार्यरत आहे आणि माझ्या मते गेल्या अनेक वर्षांपासून हीच लॉबी विभागाचे कामकाज चालवित आहे. त्यांच्या हालचालींवर माझे लक्ष असून ही लॉबी फोडण्याचा माझा प्रयत्न आहे. याबाबतील माझे मत स्पष्ट आहे, असे मुंडे यांनी सांगितले.
त्या म्हणाल्या, हे आरोप अत्यंत वरकरणी आहेत. मी खर्च करीत असलेल्या सर्व २०६ कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. परंतु मी येथे घोटाळा करण्यासाठी नसून मुलांच्या मदतीसाठी आहे. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आहे.
विरोधकांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नांचा मी आदर करते आणि त्यांच्या प्रश्नांना मी यापूर्वीच लिखित उत्तर दिले आहे, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.
(लोकमत न्यूज नेटवर्क)