बनावट कागदपत्रांद्वारे ठेकेदारांना कंत्राट
By admin | Published: July 13, 2017 02:05 AM2017-07-13T02:05:23+5:302017-07-13T02:05:23+5:30
बनावट कागदपत्रे सादर करून ठेकेदार कोट्यवधी रूपयांचे कंत्राट लाटत असल्याचा आरोप भाजपाने स्थायी समितीच्या बैठकीत आज केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: बनावट कागदपत्रे सादर करून ठेकेदार कोट्यवधी रूपयांचे कंत्राट लाटत असल्याचा आरोप भाजपाने स्थायी समितीच्या बैठकीत आज केला. पालिका रूग्णालयातील शस्त्रक्रिया विभागात वापरण्यात येणाऱ्या थ्री डोम आॅपरेशन लाईट खरेदीत अशा प्रकारेच घोटाळा सुरू असल्याचे निदर्शनास आणत भाजपाने याप्रकरणात सखोल चौकशीची मागणी केली. विरोधी पक्षांनीही याचे समर्थन केले आहे.
पालिका रूग्णालयांमधील शस्त्रक्रिया विभागात आवश्यक असणाऱ्या दिव्यांची खरेदी मध्यवर्ती खरेदी विभाग, आरोग्य विभागाच्या माध्यमातून केली जाते. तिन्ही विभाग रुग्णालयांच्या गरजेनुसार या दिव्यांची खरेदी करीत असते. अशा ‘३०थ्री’ डोम आॅपरेशन लाईट खरेदीसाठी निविदा मागवल्या. दिव्यांचा पुरवठा करणाऱ्या कंपनीकडे यासाठी सी प्रमाणपत्र असावे अशी अट घातली. मात्र पालिकेने निश्चित केलेल्या ठेकेदाराने या प्रमाणपत्राऐवजी यंत्रणेने दिलेले तांत्रिक कागदपत्रांचा आढावा अहवाल सादर केला. तरीही या ठेकेदाराला कंत्राट देण्यात आले. त्यामुळे याप्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी भाजपाचे प्रभाकर शिंदे यांनी हरकतीच्या मुद्याद्वारे केली. तर संबंधित ठेकेदाराचे अधिदान रोखण्यात यावे, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची सूचना विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली. त्यानुसार हा मुद्दा राखून ठेवण्यात आला आहे.