आता चित्रांतून उलगडणार गडसंवर्धनाच्या वाटा, पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 03:25 AM2018-04-19T03:25:32+5:302018-04-19T03:25:32+5:30
सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत येणाऱ्या पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाने राज्यातील १४ किल्ले निवडून त्याचे जतन संवर्धन करण्याचा पहिला टप्पा पार पाडला. हा टप्पा पुरातत्व विभागाने कशा पध्दतीने पार केला याबाबत ‘गडसंवर्धनाच्या मार्गावर’ हे सचित्र पुस्तक प्रसिध्द केले
मुंबई : सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत येणाऱ्या पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाने राज्यातील १४ किल्ले निवडून त्याचे जतन संवर्धन करण्याचा पहिला टप्पा पार पाडला. हा टप्पा पुरातत्व विभागाने कशा पध्दतीने पार केला याबाबत ‘गडसंवर्धनाच्या मार्गावर’ हे सचित्र पुस्तक प्रसिध्द केले असल्याने वाचकांना चित्रातून गंडसवंर्धनाच्या वाटा समजण्यास मदत होणार आहे. राज्यातील गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी कशा पध्दतीने प्रयत्न करण्यात येत आहे याचा सचित्र अनुभवच ‘गड संवर्धनाच्या मार्गावर’ या पुस्तक रुपातून वाचकांना वाचायला मिळणार आहे.
राज्य शासनाकडे संरक्षित असलेल्या ४९ गडांपैकी २८ दुर्गांच्या जतनासाठी संचालनालयाने शासनाच्य साहाय्याने पुढाकार घेतला आहे. दुर्गसंवर्धन टप्पा-१ योजनेंतर्गत पार पडलेले कार्य पहिल्यांदाच पुस्तकरुपाने वाचकांच्या समोर येणार आहे. राज्यात अंशात्मक टिकून राहिलेले, थोडेफार अवशेष असलेले, फक्त तटबंदीच्या स्वरुपात शिल्लक आणि बºयापैकी टिकून असलेले असे सर्व मिळून ३५० किल्ले आहेत. यापैकी ४७ किल्ले राष्ट्रीय संरक्षित स्मारक असून ते केंद्र शासनाच्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या आखत्यारित आहेत तर ४९ किल्ले राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित झाले आहेत. महाराष्ट्रातील राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित झालेल्या किल्ल्यांचे रक्षण करणे त्यांचे जतन करण्याचे काम पुरातत्व विभाग करीत आहे.
या किल्ल्यांचा समावेश
या पुस्तकात रत्नागिरीतील शिरगाव किल्ला, नाशिक जिल्हयातील खर्डा किल्ला, गाळणा किल्ला, पुणे जिल्ह्यातील तोरणा आणि भूदरगड किल्ला, औरंगाबादमधील अंतूर, परांडा आणि धारुर किल्ला, नांदेड मधील औसा, कंधार आणि माहूर किल्ला, नागपूरच्या नगरधन, अंबागड आणि माणिकगड येथील जतन आणि दुरुस्ती कशी करण्यात आली याबाबतची माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे जतन-दुरुस्ती कामापूर्वी आणि जतन- दुरुस्ती कामानंतर या गड किल्ल्यांचे स्वरुप कसे बदलले आहे हे या पुस्तकात दाखवले आहे.