घारापुरी विद्युतीकरण प्रकल्पात मोलाचा वाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 05:41 AM2018-03-08T05:41:26+5:302018-03-08T05:41:26+5:30
भांडुप नागरी परिमंडळाचे तत्कालीन मुख्य अभियंता व सध्याचे कोकण प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक सतीश करपे यांनी, घारापुरी बेटास विद्युतीकरण करण्याचा, शासनाचा प्रकल्प हाती घेतला होता. या प्रकल्पाच्या माध्यमातून स्वातंत्र्यप्राप्तीनंतर म्हणजे तब्बल ७० वर्षांनंतर या बेटावर वीज पोहोचवायची होती.
मुंबई - भांडुप नागरी परिमंडळाचे तत्कालीन मुख्य अभियंता व सध्याचे कोकण प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक सतीश करपे यांनी, घारापुरी बेटास विद्युतीकरण करण्याचा, शासनाचा प्रकल्प हाती घेतला होता. या प्रकल्पाच्या माध्यमातून स्वातंत्र्यप्राप्तीनंतर म्हणजे तब्बल ७० वर्षांनंतर या बेटावर वीज पोहोचवायची होती. या प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यातील महत्त्वाची कामे यशस्वीरीत्या पूर्ण करण्याची जबाबदारी भांडुप नागरी परिमंडळाच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण यांच्यावर होती. प्रकल्पांतर्गत महावितरणने प्रथमच दीड मीटर समुद्र तळाखालून सुमारे ७.५ किमीची वीजवाहिनी टाकून घारापुरी बेटास वीज पोहोचविली आहे. प्रकल्पाचे लोकार्पण २२ फेब्रुवारी २०१८ रोजी करण्यात आले.
महावितरणसारख्या राज्यव्यापी वीज कंपनीमध्ये भांडुप नागरी परिमंडळाच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण या आपले कर्तव्य धडाडीने व खंबीरपणे पार पाडत आहेत. स्त्री म्हणून कर्तव्यात कुठेही मर्यादा न पडू देता, आज त्या पुरुषांच्या बरोबरीने आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहेत. महावितरणमधील मुख्य अभियंता या पदावर नियुक्त होणाºया त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. मार्च २०१५ मध्ये मुख्य अभियंता पदी निवड झाल्यानंतर, त्यांनी महावितरणच्या ‘प्रकाशगड’ या मुख्यालयात मुख्य अभियंता (वितरण), मुख्य अभियंता (एकात्मिक ऊर्जा विकास योजना) या पदाचे यशस्वीपणे काम पहिले आहे. चव्हाण यांनी १९८९ साली महावितरणमध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून काम सुरू केले. २७ वर्षांहून अधिक काळ त्या सेवा बजावत आहेत.
महावितरणचे पूर्ण राज्यात १६ परिमंडळे आहेत. या १६ परिमंडळांतून राज्यात फक्त भांडुप नागरी परिमंडळाच्या मुख्य अभियंता पदी एकमेव महिला अधिकारी म्हणून पुष्पा चव्हाण या कार्यरत आहेत. भांडुप नागरी परिमंडळांतर्गत मुंबई, नवी मुंबई, ठाणे, तसेच पनवेल-उरण पर्यंतचा भाग येतो. विजेच्या वापराबाबत राज्याच्या तुलनेत हा विभाग औद्योगिक व आर्थिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या परिसरातील सुमारे १८ लाखांहून अधिक ग्राहकांना सेवा देण्यासाठी सुमारे २ हजार ८५८ तांत्रिक-अतांत्रिक, अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. भांडुप नागरी परिमंडळाची वार्षिक आर्थिक उलाढाल ही सुमारे ६ हजार कोटी आहे. आजघडीला हा सर्व व्याप पुष्पा चव्हाण यांनी मुख्य अभियंता म्हणून पेललेला आहे.
पतीची सोबत महत्त्वाची
प्रत्येक महिला ही एक स्वतंत्र व्यक्ती असून, आपल्या कामातून वेगळी ओळख निर्माण करण्याचा नैसर्गिक अधिकार प्रत्येक महिलेला आहे, अशी विचारसरणी असणारे व समाजसेवेची आवड जोपासणारे पती रामचरण चव्हाण यांची सोबत कारकिर्दीसाठी महत्त्वाची ठरली.
- पुष्पा चव्हाण, मुख्य अभियंता-महावितरण (भांडुप नागरी परिमंडळ)