महिला शेतकऱ्यांचे देशाच्या कृषिक्षेत्राच्या विकासात योगदान; मुख्यमंत्र्यांचा लेख आर्थिक परिषदेकडून प्रकाशित
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 09:39 AM2024-01-05T09:39:28+5:302024-01-05T09:39:56+5:30
माविम सुमारे दीड लाख महिला बचत गटांच्या माध्यमातून ३६१ संघ स्थापन करून त्यांना शेतीमाल उत्पादन आणि बाजारपेठेशी जोडणार असल्याचे या लेखात नमूद केले आहे.
मुंबई : शेतात राबणाऱ्या आपल्या महिला भगिनी राज्य आणि पर्यायाने देशाच्या कृषिक्षेत्राच्या विकासात अमूल्य योगदान देत आहेत. यात महाराष्ट्रातील शेतकरी भगिनी ‘महिला आर्थिक विकास महामंडळा’च्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात अग्रेसर आहेत. महिलांचे हे योगदान आणि ‘माविम’च्या कामाची माहिती देणारा मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांचा लेख जागतिक आर्थिक परिषदेने प्रकाशित केला आहे.
माविम सुमारे दीड लाख महिला बचत गटांच्या माध्यमातून ३६१ संघ स्थापन करून त्यांना शेतीमाल उत्पादन आणि बाजारपेठेशी जोडणार असल्याचे या लेखात नमूद केले आहे.
डिजिटल ॲग्रिकल्चरल फ्रेमवर्क लवकरच
फार्म-टू-मार्केट या व्यासपीठाद्वारे मूल्यसाखळीमध्ये महत्त्वपूर्ण असे परिवर्तन आणण्यासाठी माविम प्रयत्नशील आहे. लवकरच माविम डिजिटल ॲग्रिकल्चरल फ्रेमवर्क प्रत्यक्षात आणणार आहे. यामध्ये १२ खासगी कंपन्याही सहभागी होणार आहेत. ग्रामीण भागातील महिलांना जमीन, तंत्रज्ञान आणि वित्तीय सेवा उपलब्ध करून दिल्यास जगभरातील कृषी उत्पन्नात आणि अन्न सुरक्षा यांमध्ये २० ते ३० टक्क्यांनी वाढ होणार आहे, यावरही मुख्यमंत्र्यांनी लेखात भाष्य केले आहे.