समीक्षेतील योगदान अतुलनीय
By admin | Published: February 29, 2016 12:46 AM2016-02-29T00:46:53+5:302016-02-29T00:46:53+5:30
प्रा. रा. ग. जाधव यांनी मराठी साहित्यातील समिक्षेच्या क्षेत्रात दिलेले योगदान अतुलनीय आहे, असे गौरवोदगार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी रविवारी येथे काढले.
पुणे : प्रा. रा. ग. जाधव यांनी मराठी साहित्यातील समिक्षेच्या क्षेत्रात दिलेले योगदान अतुलनीय आहे, असे गौरवोदगार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी रविवारी येथे काढले.
राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार प्रा. रा. ग. जाधव यांना डॉ. मोरे यांच्या हस्ते आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत रविवारी प्रदान करण्यात आला. प्रा. जाधव यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास आमदार प्रा. मेधा कुलकर्णी, नगरसेवक गणेश बीडकर, श्रीनाथ भिमाले, मुक्ता टिळक, साधनाचे संपादक विनोद शिरसाठ, सुनील महाजन आदी उपस्थित होते.
डॉ. मोरे म्हणाले, प्रा. जाधव यांनी विविध प्रकारच्या साहित्याची समीक्षा केली. दलित साहित्याची सर्वप्रथम समीक्षा जाधव यांनीच केली. मराठी साहित्यातील श्रेष्ठ अशा पाच समीक्षकांची निवड करायची झाल्यास त्यामध्ये प्रा. जाधव यांचा आवर्जून समावेश करावा लागेल.
विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कारासाठी जाधव यांची निवड केल्याबद्दल राज्य शासनाचे अभिनंदन करतो, असेही डॉ. मोरे यांनी सांगितले.
तावडे म्हणाले, साहित्यिकांमुळे मराठी भाषा सर्वांपर्यंत पाहोचते, मराठी भाषेचे संवर्धन होते. मराठी साहित्याचे दालन प्रा. रा. ग. जाधव यांनी समृद्ध केले आहे. समितीने त्यांची एकमताने निवड केली. त्यांचा या पुरस्काराने गौरव करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. मुंबई येथ शनिवारी मराठी भाषा दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात राज्य शासनाच्या विविध पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पण प्रकृती ठीक नसल्याने प्रा. जाधव त्या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत. रविवारी तावडे यांनी जाधव यांच्या निवासस्थानी जाऊन पुरस्कार प्रदान केला. (प्रतिनिधी)