भाजपा आणि मित्र संघटनांचा टाऊनहॉलच्या तारखेवर ताबा
By admin | Published: January 18, 2017 03:51 AM2017-01-18T03:51:54+5:302017-01-18T03:51:54+5:30
निवडणुका जाहीर होताच शहरातील प्रत्येक मैदान आणि हॉल सभांसाठी बुक करण्याची चढाओढ राजकीय पक्षांत सुरू होते.
पंकज पाटील,
उल्हासनगर- निवडणुका जाहीर होताच शहरातील प्रत्येक मैदान आणि हॉल सभांसाठी बुक करण्याची चढाओढ राजकीय पक्षांत सुरू होते. असाच प्रकार उल्हासनगरच्या हाऊन हॉलच्या बाबतीत घडला आहे. पालिकेने खाजगी ठेकेदाराला चालवायला दिलेल्या टाऊनहॉलमधील सभागृह भाजपा आणि त्यांच्या मित्रसंघटनांनी मोक्याच्या दिवशी ताब्यात ठेवल्याने अन्य पक्षांची पंचाईत होणार आहे.
टाऊन हॉल जरी पालिकेच्या मालकीचा असला, तरी तो ठेकेदाराला चालविण्यासाठी दिला आहे. निवडणुकीच्या काळात या हॉलच्या तारखा मंजूर करण्याचे अधिकार पालिकेकडे असणे क्रमप्राप्त आहे. सर्व राजकीय पक्षांना न्याय मिळावा, यासाठी हॉलचे समान वाटप गृहीत धरण्यात आले आहे. मात्र उल्हासनगरमधील टाऊनहॉलवर भाजपाचा आणि त्यांच्याशी जवळीत साधणाऱ्या मित्र संघटनांचा अधिकार चालतो हे यातून दिसून आले. निवडणूक काळातील सर्व रविवार या पद्धतीने बुक करण्यात आल्याने इतर पक्षांना रविवारी हा हॉल उपलब्ध होणार नाही.
साधारणत: एखाद्या कार्यक्रमासाठी हा हॉल तीन ते चार तासांसाठी बुक केला जातो. मात्र निवडणूक काळात प्रत्येक रविवारी या हॉलचे बुकिंग थेट सकाळी १० ते रात्री ११ वाजेपर्यंत करण्यात आले आहे. रविवारी १३ तासांचे बुकींग असल्याने इतर पक्षांना हा हॉल वापरताच येणार नाही. २२ जानेवारीला हा हॉल अजित शर्मा यांच्या नावे आहे. त्या दिवशी हा हॉल सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत बुक असणार आहे. २९ जानेवारीला दुपारी १२ ते रात्री १० वाजेपर्यंत कुमार आयलानी यांनी स्वत:च्या नावे हा हॉल बुक करुन ठेवला आहे. त्यामुळे तो रविवार देखील इतर पक्षांसाठी बाद झाला आहे. ५ फेब्रुवारीचा रविवारही एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यासाठी बुक करण्यात आला आहे. त्या दिवशीही हा हॉल सकाळी ९.३० ते रात्री ९.३० पर्यंत बुक राहणार आहे. १२ फेब्रुु्रवारीचा रविवार मात्र खरोखरच सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आधीच देण्यात आला आहे. तो दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत बुक राहणार आहे. त्यामुळे या रविवारी फक्त सकाळच्या सत्रासाठी हॉल उपलब्ध राहणार आहे. मात्र सर्वात महत्त्वाचा रविवार म्हणजे १९ फेबु्रवारी. त्या दिवशीही हा हॉल वसंत चंद्रिका यांच्या नावे १३ तासांसाठी बुक करण्यात आला आहे. सकाळी १० ते रात्री ११ पर्यंत हा हॉल बुक आहे.
राजकीय सभांसाठी आणि कार्यकर्ता मेळाव्यांसाठी टाऊन हॉल हे सोयीचे ठिकाण असल्याने भाजपा आणि त्यांच्याशी जवळीक साधणाऱ्यांनी हे हॉल आधीच बुक करुन ठेवले आहेत. हॉल भाडेत्वावर घेतांना तब्बल १२ ते १३ तासांसाठी तो अडकवून ठेवल्याने त्यामागचा राजकीय प्रभाव आपोआपच स्पष्ट झाला. त्यामुळे या हॉलचे आधीचे बुकिंग रद्द करुन त्यांचे फेरवाटप करण्याची मागणी आता इतर राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. याबाबत विचारले असता पालिकेच्या अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. रविवारच्या बुकिंगचे अर्ज आलेले असले, तरी त्यांना अद्याप मंजुरी दिलेली नाही अशी सारवासारव त्यांनी केली.
>‘‘ सर्वसामान्य नागरिकांसाठी हा हॉल रविवारी बुक असतानाही तो हॉल राजकीय पक्षांसाठी देण्यात आला आहे. त्याबाबत आम्ही महापालिका आयुक्तांकडे तक्रार करणार आहोत. - राजेंद्र चौधरी,
शिवसेना शहर प्रमुख
>‘‘ जानेवारीचे दोन रविवार भाजपातर्फे बुक करण्यात आले आहेत. बुुकिंग नियमाप्रमाणे असुन त्यामागे राजकीय हेतू असण्याचे कारणच नाही. फेब्रुवारी महिन्यात भाजपातर्फे कोणतेही बुकिंग नाही. - कुमार आयलानी,
भाजपा जिल्हाध्यक्ष.