‘इस्माईल युसूफ’चा ताबा मुस्लीम समाजाकडेच राहावा
By admin | Published: February 25, 2015 02:24 AM2015-02-25T02:24:14+5:302015-02-25T02:24:14+5:30
जोगेश्वरी येथील इस्माईल युसूफ महाविद्यालयाची जागा वक्फ बोर्डाकडे हस्तांतरित करण्यास अथवा येथील मोकळ्या जागेत अन्य महाविद्यालय उभारण्यास मुंबई काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाने विरोध केला आहे.
मुंबई : जोगेश्वरी येथील इस्माईल युसूफ महाविद्यालयाची जागा वक्फ बोर्डाकडे हस्तांतरित करण्यास अथवा येथील मोकळ्या जागेत अन्य महाविद्यालय उभारण्यास मुंबई काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाने विरोध केला आहे.
इस्माईल युसूफ विद्यालयावरील ताबा आणि येथील नवीन प्रस्तावासंदर्भात सध्या वाद सुरू आहेत़ याबाबत आपली भूमिका मांडताना मुंबई काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष निजामुद्दीन राईन म्हणाले, की मुस्लीम समाजाच्या विकासासाठी या महाविद्यालयाची जागा देण्यात आली होती. त्यामुळे त्याचा ताबा मुस्लीम समाजाकडेच सोपवण्यात यावा. अल्पसंख्याक समाजातील भाजपाशी संबंधित काही नेत्यांनी इस्माईल युसूफ महाविद्यालयाची जागा वक्फ बोर्डाकडे हस्तांतरित करण्याची मागणी केली. मात्र महाविद्यालयाची जागा सरकारी हस्तक्षेप नसणाऱ्या मुस्लीम समाजातील प्रथितयश संस्थेच्या ताब्यात द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. सरकारला नवीन महाविद्यालय सुरू करायचे असेल तर कलिना येथील विद्यापीठ संकुलातील रिकाम्या जागेवर उभारावे, असा टोलाही राईन यांनी हाणला. या संदर्भात लवकरच पक्षाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे राईन यांनी सांगितले.