टोळधाडीवर दोन दिवसात नियंत्रण मिळविणार - कृषिमंत्री दादा भुसे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 03:50 PM2020-06-02T15:50:36+5:302020-06-02T15:50:47+5:30
टोळधाडीचे दोन थवे सध्या कार्यरत आहेत. पारशिवनी तालुक्यात सध्या उद्रेक सुरू आहे.
नागपूर : टोळधाडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभाग पूर्णत: प्रयत्न करीत आहे. येत्या दोन दिवसात यावर नियंत्रण मिळवले जाईल, असा विश्वास राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला. नियंत्रणासाठी ड्रोनने फवारणीचे नियोजन आहे. मात्र याचा दुष्परिणाम जलसाठ्यावर होऊ नये, याची देखील काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे यावर आज सायंकाळपर्यंत निर्णय घेतला जाईल.
टोळधाडीचे दोन थवे सध्या कार्यरत आहेत. पारशिवनी तालुक्यात सध्या उद्रेक सुरू आहे. फायर ब्रिगेडच्या माध्यमातून यावर नियंत्रण राखण्यात बर्यापैकी यश आलेले आहे. क्लोरोफाइमफोर्स या कीटकनाशकाची आतापर्यंत पाचशे लिटर फवारणी झालेली आहे. टोळधाडीमुळे भाजीपाला तसेच संत्रा, मोसंबी या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यासंदर्भात आढावा घेण्याच्या सूचना कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. टोळधाडीमुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीचा समावेश पीकविम्यामध्ये करता येईल काय, या संदर्भात केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाशी चर्चा केली जात आहे.
राज्यात अलीकडे प्रथमच असा प्रसंग निर्माण झाल्याने त्याबद्दल केंद्राचे देखील मत विचारात घेतले जाणार आहे. बियाणे व खतांची टंचाई पडणे तसेच त्याचा काळाबाजार होणार नाही याची दक्षता कृषी विभागाकडून घेतली जात आहे. एक हजार टन बियाणे आणि एक लाख टन खताचे वाटप आजवर झालेले आहे. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती अभियान योजनेत आतापर्यंत 32 लाख शेतकऱ्यांचे अर्ज आले आहेत, त्यातील 30 लाख अर्ज पात्र ठरले असून, 19 लाख शेतकऱ्यांना 12 हजार कोटी रुपयांचे कर्ज त्यांच्या खात्यावर वर्ग केले आहे, कोरोनाच्या प्रकोपामुळे प्रक्रिया लांबली. त्यामुळे याला थोडा विलंब झाला आहे.