साठेबाजांची डाळ शिजू न देता डाळीचे दर नियंत्रणात आणा - उद्धव ठाकरे

By admin | Published: October 20, 2015 09:06 AM2015-10-20T09:06:51+5:302015-10-20T09:09:12+5:30

डाळींच्या वाढत्या किमतींबाबत चिंता व्यक्त करत सरकारने साठेबाजांची डाळ शिजू न देता, त्यांच्यावर कारवाई करून दरवाढ नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करावे, असा सल्ला उद्धव ठाकरेंनी सरकारला दिला

Control the rate of pulse without stirring the dal of the stock - Uddhav Thackeray | साठेबाजांची डाळ शिजू न देता डाळीचे दर नियंत्रणात आणा - उद्धव ठाकरे

साठेबाजांची डाळ शिजू न देता डाळीचे दर नियंत्रणात आणा - उद्धव ठाकरे

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० - डाळींच्या गगनाला भिडलेल्या किमतींबाबत चिंता व्यक्त करत सरकारने साठेबाजांची डाळ शिजू न देता, त्यांच्यावर कारवाई करून दरवाढ तातडीने नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करावे, असा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सरकारला दिला आहे. या डाळींच्या दरवाढीमुळे सामान्यांच्या डोळ्यांत अश्रू आणले असून ते पुसण्याची गरज असल्याचे मत सामनाच्या अग्रलेखात व्यक्त करण्यात आले आहे. 
गॅसवर किंवा चुलीवर शिजणारी डाळ आता सोशल मीडियावरच जास्त शिजू लागली आहे. प्रचंड भाववाढीमुळे स्वयंपाकघरातील डाळींना ‘व्हॉटस् अ‍ॅप’वर स्थान मिळाले आहे. यासंबंधी अनेक विनोद चेहर्‍यावर क्षणभर हसू  खुलवत असले तरी त्यामागचे गांभीर्य लक्षात घेतले पाहिजे.  काही महिन्यंपूर्वी कांद्याने शंभरी गाठली असता आयात कांद्याचा उतारा करून सरकारने कांद्याची दरवाढ नियंत्रणात आणली होती. डाळींचे दर खाली आणण्यासाठीही अशाच उपाययोजनांची गरज आहे, असे उद्धव यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने आता साठेबाजीवर अंकुश आणण्यासाठी पावले उचलली आहेत. डाळींची साठेबाजी आणि काळाबाजार करणार्‍यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश राज्य सरकारांना दिले आहेत हे चांगलेच असले तरीही त्यामुळे डाळींनी भाववाढीचा जो विक्रम मोडला आहे तोदेखील लवकरात लवकर मोडीत निघावा अशी अपेक्षा उद्धव यांनी व्यक्त केली आहे. 
डाळींचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने आयातदार-निर्यातदार, मोठे रिटेलर्स, बडे घाऊक विक्रेते, अन्न प्रक्रियादार यांना डाळींच्या साठ्याचे प्रमाण ठरवून दिले आहे. त्यानुसारच त्यांना डाळींचा साठा यापुढे करता येईल. त्यामुळे भाववाढीच्या शर्यतीत डाळी जरी भरपूर पुढे निघून गेल्या तरी आता सरकारच्या प्रयत्नांमुळे त्यांच्या भाववाढीचा वेग मंदावेल आणि डाळींचे दर किमान पातळीवर यायला हरकत नाही. तूरडाळीने किलोमागे २०० रुपये पार केले असतानाच उडीद डाळही डीदशेपर्यंत पोचली आहे. इतर डाळीदेखील दरवाढीबाबत एकमेकींशी स्पर्धाच करीत आहेत. त्यामुळे सरकारतर्फे हालचाल होत असली तरी परिस्थिती नियंत्रणात यायला अवधी लागू शकतो. तो कसा कमीत कमी लागेल याकडे आता सरकारने लक्ष द्यायला हवे, असेही अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.
दुष्काळ आणि इतर कारणांमुळे देशांतर्गत डाळींचे उत्पादन कमी झाले. उत्पादनातील ही घट आयात डाळीच्या रूपात भरून काढायला मर्यादा आहेत, त्यात कृत्रिम साठेबाजीमुळे डाळींची भाववाढ गगनाला भिडली ही वस्तुस्थिती असली तरी साठेबाजांविरुद्ध कारवाईची ‘डाळ’ कशी शिजेल, दरवाढ तातडीने नियंत्रणात कशी येईल, यावर केंद्र व राज्य सरकारांने लक्ष केंद्रित करायला हवे, तरच निदान दिवाळीपर्यंत डाळींचे भाव आटोक्यात येतील. डाळींच्या साठ्यावर नियंत्रण आणि साठेबाजांविरुद्ध कारवाई असा दुहेरी बडगा सरकारने उगारला आहे. त्यामुळे भाववाढीचा ‘डाळ तडका’ कमी होईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
 

Web Title: Control the rate of pulse without stirring the dal of the stock - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.