कल्याण-नेवाळीतील परिस्थिती नियंत्रणात, परिसरात कडेकोट बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2017 01:41 PM2017-06-22T13:41:49+5:302017-06-22T17:30:34+5:30
नेवाळी येथील परिस्थिती नियंत्रणात असून पोलीस तसेच महसूल प्रशासनाचे अधिकारी याठिकाणी उपस्थित आहेत, अशी माहिती उपविभागीय अधिकारी प्रसाद उकर्डे यांनी दिली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि 22 - नेवाळी येथील परिस्थिती नियंत्रणात असून पोलीस तसेच महसूल प्रशासनाचे अधिकारी याठिकाणी उपस्थित आहेत, अशी माहिती उपविभागीय अधिकारी प्रसाद उकर्डे यांनी दिली आहे. गुरुवारी सकाळी कल्याण- मलंगगड रस्ता ग्रामस्थांनी रोखून धरला होता. विमानतळ जमीन संपादनाला विरोध म्हणून शेतक-यांनी हा रस्ता रोको होता. जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असून ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. आंदोलनकर्त्यांची समजूत घालण्यात येत आहे असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात येथील १,६०० एकर जागा ताब्यात घेण्यात आली होती. या जागेवर संरक्षण विभागातर्फे संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरु करण्यावरून स्थानिक शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला होता.
त्यानुसार गुरुवारी रस्ता रोकोची नोटीस देण्यात आली होती अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त ( गुन्हे) मकरंद रानडे यांनी दिली. भाल व परिसरातील आंदोलनकर्त्यांनी नवी मुंबई, बदलापूर कडे जाणाऱ्या रस्त्यांवर टायर्स जाळून वाहतुक रोखून धरली होती. तसेच पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली एका गाडीची जाळपोळ झाली तसेच एक-दोन पोलीस यात जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र पॅलेट गनचा वापर केल्याबाबत त्यांनी काही माहिती दिलेली नाही. सनदशीर मार्गाने आपले म्हणणे मांडावे व हिंसा करु नये असे, आवाहन पोलीस व महसूल अधिकाऱ्यांनी केले आहे.
दरम्यान. १९९४ पर्यंत नेवाळी परीसरातील जागेच्या सातबाऱ्यावर शेतकऱ्यांची नावे होती तसेच सदरची जागा संरक्षण खात्याने भाडेतत्वावर घेतल्याचे कागदपत्र शेतकऱ्यांकडे आहेत. त्यामुळे कोणतीही भरपाई न देता नावावर केलेल्या सदर जमिनीच्या सातबाऱ्यावरील संरक्षण खात्याच्या नोंदी कमी कराव्यात. केंद्र सरकाराने थेट शेतक-यांशी चर्चा करावी कोणीही राजकिय नेता मघ्ये न टाकता शेतकऱ्यांचा प्रश्न शेतकरी आणि केंद्र सरकार यांनी बसून सोडवावा आणि शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घ्यावा अशी मागणी मनसेचे सरचिटणीस राजू (प्रमोद) पाटील यांनी केली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
स्वातंत्र्यपूर्व भारतात १९४२ सालच्या दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी नेवाळी येथे ब्रिटिश सैन्याने एक हजार ६५० एकर जागा संपादित करून विमानतळ उभारले होते. मात्र, ही जागा केंद्र सरकारने अजूनही शेतकऱ्यांना परत केलेली नाही. या जागेवर आता नौसेनेने ताबा घेतला आहे. तेथे संरक्षक भिंत उभारली जाणार आहे.
१९४२ मध्ये ब्रिटिश सरकारने नेवाळी परिसरात संपादित केलेली एक हजार ६५० एकर जागा आजपासच्या १८ गावांतील शेतकऱ्यांची आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर भारत सरकारने ही जागा शेतकऱ्यांना परत करणे अपेक्षित होते. मात्र, सरकारने ही जागा संरक्षण खात्याकडे वर्ग केली. संरक्षण खात्याने ही जागा नौसेनेला दिली आहे. या जागेवर नौसेनेने संरक्षक भिंत उभारण्याचे काम हाती घेतले आहे. शेतकऱ्यांच्या जागा परत न करता तेथे संरक्षण भिंत उभारण्यास शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.