वडाळ्याच्या आगीवर नियंत्रण

By Admin | Published: June 15, 2015 02:25 AM2015-06-15T02:25:54+5:302015-06-15T02:25:54+5:30

वडाळा येथील मुंबई पोर्ट ट्रस्टच्या परिसरात असणाऱ्या पेट्रोलच्या पाइपलाइनला शनिवारी सायंकाळी लागलेली मोठी आग अग्निशमन दलाच्या जवानांनी

Control of Wadi Fires | वडाळ्याच्या आगीवर नियंत्रण

वडाळ्याच्या आगीवर नियंत्रण

googlenewsNext

मुंबई : वडाळा येथील मुंबई पोर्ट ट्रस्टच्या परिसरात असणाऱ्या पेट्रोलच्या पाइपलाइनला शनिवारी सायंकाळी लागलेली मोठी आग अग्निशमन दलाच्या जवानांनी फ्लॅशबॅक आणि सेफमोड या तंत्रज्ञानाचा वापर करत रविवारी सकाळी ७:३०च्या सुमारास नियंत्रणात आणली.
वडाळा येथील मुंबई पोर्ट ट्रस्टच्या परिसरात असणाऱ्या पेट्रोलच्या पाइपलाइनला २ क्रमांकाच्या वर्दीची आग लागल्याची माहिती महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाला शनिवारी सायंकाळी ६:४६च्या सुमारास मिळाली. त्यानुसार तातडीने पावले उचलत आगीवर नियंत्रण मिळविण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली. अग्निशमन दलाच्या प्रचलित कार्यपद्धतीनुसार किरकोळ आग असल्यास १ क्रमांकाची वर्दी दिली जाते, तर मोठी आग असल्यास २ क्रमांकाची वर्दी दिली जाते. मात्र अत्यंत मोठी आग असल्यास ‘ब्रिगेड कॉल’ घोषित केला जातो, ज्यामध्ये इतर अग्निशमन यंत्रणांची मदत घेतली जाते. वडाळा येथील आग तसेच इतर अग्निशमन यंत्रणांचीही मदत घेण्यात आली. आगीचा आवाका व संभाव्य परिणाम लक्षात घेऊन आयुक्त अजय मेहता यांनी मध्यरात्री घटनास्थळी धाव घेऊन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली व परिस्थितीचा आढावा घेतला.
पाण्यावर पसरलेल्या तेलाच्या तवंगास आग लागून पेट्रोलजन्य आग पसरू नये याकरिता आवश्यक असणारे विशिष्ट प्रकारचे ‘फोम’ अग्निशमन दलास तातडीने उपलब्ध व्हावे, याबाबत आयुक्तांनी आपत्कालीन नियंत्रण कक्षाला आदेश दिले. त्यानुसार तातडीने कार्यवाही करत ‘फोम’चा पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांशी संपर्क साधून त्याबाबतची माहिती अग्निशमन दलास वेळेत उपलब्ध करून देण्यात आली. ज्यामुळे सदर फोम वेळेत उपलब्ध होऊन आवश्यक ती कार्यवाही करणे अग्निशमन दलास शक्य होऊन आग पसरण्याचा धोका नियंत्रणात आणता आला. रविवारच्या सकाळपर्यंत प्रयत्नांची शर्थ करत मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. त्याचबरोबर आग आटोक्यात आणण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन, राष्ट्रीय केमिकल व फर्टिलायझर, ठाणे महापालिका, नवी मुंबई महापालिका, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण, औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालय यांच्या अग्निशमन यंत्रणांचीही मदत घेण्यात आली होती. तथापि, ही आग एवढ्या मोठ्या प्रमाणात का लागली? यामागील कारणांचा शोध घेतला जात आहे, असे महापालिका प्रशासनातर्फे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Control of Wadi Fires

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.