सीबीआयच्या मदतीला वादग्रस्त अधिकारी
By admin | Published: August 24, 2015 01:29 AM2015-08-24T01:29:48+5:302015-08-24T01:29:48+5:30
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासासाठी राज्य शासनाने सीबीआयच्या मदतीला दिलेल्या पोलीस अधिकाऱ्यांमधील काहींची
लक्ष्मण मोरे, पुणे
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासासाठी राज्य शासनाने सीबीआयच्या मदतीला दिलेल्या पोलीस अधिकाऱ्यांमधील काहींची कारकीर्द वादग्रस्त असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सरकारला हत्येचा तपास गांभीर्याने करायचा आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
दाभोलकरांच्या द्वितीय स्मरणदिनी मुख्यमंत्र्यांनी टिष्ट्वट करुन सहायक आयुक्त गणपत माडगूळकर, पोलीस निरीक्षक चंद्रकांत घोडके, सतीश देवरे, दिनकर कदम यांना तपास कामी नेमण्यात आल्याची माहिती दिली होती. पुणे आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेअंतर्गत सोनसाखळी चोरीविरोधी पथकाचे प्रमुख घोडके यांना वर्षभरात कोणतीही चमकदार कामगिरी करता आलेली नाही. घोडके यांचे पथक सोनसाखळी चोर पकडायचे सोडून जुगार अड्डे, मटकेवाले यांच्यावरच अधिक लक्ष ठेवून असायचे. त्यामुळे तत्कालीन पोलीस आयुक्त सतीश माथूर यांनी हे पथकच बरखास्त केले होते. कोथरूड पोलीस ठाण्याचे निरीक्षक म्हणूनही त्यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे. सतीश देवरे हे
पुण्यात सुरुवातीच्या काळात गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाचे निरीक्षक होते. त्यांची बदली हिंजवडी पोलीस ठाण्यात झाल्यानंतर अल्पावधीत गुन्हे पोलीस निरीक्षकाशी त्यांचे ‘अर्थ’पूर्ण खटके उडू लागले. त्यांचे कारनामे बाहेर येऊ
लागल्यावर तत्कालीन पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांच्याशी त्यांचा वादही झाला होता.उमाप यांनी त्यांची तडकाफडकी विशेष शाखेत बदली केली. बदलीनंतरही गुन्हे निरीक्षकांशी त्यांची हमरीतुमरी झाल्याने तत्कालीन सहायक आयुक्तांनी त्यांची खात्यांतर्गत चौकशीही केली होती.
पोलीस निरीक्षक दिनकर कदम यांना तर नवे पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी नियंत्रण कक्षामध्ये बदलले होते. सोनसाखळी चोरट्यांबद्दल कदम यांच्याकडे
माहिती विचारल्यानंतर त्यांना समाधानकारक उत्तरच देता आले नव्हते. त्यामुळे आयुक्तांनी कदम त्यांना थेट नियंत्रण कक्षाशी संलग्न केले होते. त्यानंतर त्यांची विशेष शाखेत बदली झाली.
सहायक पोलीस आयुक्त पदाच्या बढतीवर पुण्याबाहेर गेलेले गणपत माडगूळकर यांची औरंगाबाद येथील बदली काही दिवसांतच रद्द झाली. बदली रद्द करून
पुण्यामध्ये परतलेल्या माडगूळकर यांच्याकडे सध्या मनुष्यबळ विकास व मुख्यालयाची जबाबदारी आहे. पोलिसांच्या भाषेत माडगूळकर सध्या ‘साईड ब्रान्च’ला काम करीत आहेत.