आंदोलनापूर्वीच काढला वादग्रस्त फलक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2016 02:32 AM2016-05-08T02:32:03+5:302016-05-08T02:32:03+5:30
कोपरगाव परिसरातील हनुमान मंदिरात महिलांना मॅक्सी (गाऊन) घालून येण्यास बंदी असलेला फलक लावल्याचा मुद्दा ‘लोकमत’ने मांडल्यानंतर तृप्ती देसाई यांच्या भूमाता
डोंबिवली : कोपरगाव परिसरातील हनुमान मंदिरात महिलांना मॅक्सी (गाऊन) घालून येण्यास बंदी असलेला फलक लावल्याचा मुद्दा ‘लोकमत’ने मांडल्यानंतर तृप्ती देसाई यांच्या भूमाता ब्रिगेडच्या महिलांनी आज आंदोलन केले. या कार्यकर्त्या फलकाला काळे फासणार असल्याची कुणकुण लागल्याने त्यापूर्वीच तेथील वादग्रस्त फलक काढण्यात आला. त्यामुळे हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेऊन कार्यकर्त्या तेथून निघून गेल्या.
शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक रमेश म्हात्रे मंदिराचे ट्रस्टी असल्याने पोलिसांनी त्यांना तेथे चर्चेसाठी बोलावले, पण तेथे आले नाहीत. उलट, त्यांनी मेगाफोनवरून तृप्ती देसाई या हिंदू धर्माविरोधात असल्याचे आवाहन स्थानिक नागरिकांना करण्यास सुरुवात केली. लोक जमू लागल्याने परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी तत्काळ दोन गाड्या भरून पोलिसांचा फौजफाटा तेथे मागवण्यात आला आणि भूमाताच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन पूर्ण झाल्याने पोलिसांच्या विनंतीवरून ते तेथून निघून गेले.
कोपर परिसरातील मंदिरांत महिलांनी मॅक्सी घालून जाऊ नये, असे फलक यापूर्वीच लावण्यात आले आहेत. मात्र, फक्त महिलांच्या वेशावर निर्बंध असल्याने त्याविरोधात भूमाता ब्रिगेडने आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना फलकाला काळे फासण्याचे आंदोलन करण्यास सांगितले. त्यानुसार, शनिवारी सकाळी भावना शिरसेकर, कविता शिवपुरी, भावना शिवपुरी, सुजाता सदाफुले, चंदिका पांडे यांच्यासह ब्रिगेडचे मुंबई आणि कल्याणमधील कार्यकर्ते हनुमान मंदिराच्या आवारात पोहोचले. पण, तोवर ‘देवळात मॅक्सी घालून येऊ नये,’ असे सांगणारा फलक काढून ठेवण्यात आला होता. या आंदोलनाची पूर्वकल्पना भूमाता ब्रिगेडने विष्णूनगर पोलीस ठाण्याला दिल्याने कार्यकर्ते मंदिरात पोहोचण्यापूर्वीच पोलीस उपनिरीक्षक तानाजी कापडे यांच्यासह दोन महिला पोलिसांसह काही पोलीस तेथे पोहोचले. ‘कालपर्यंत असलेला फलक अचानक कुठे गेला? तो अचानक कोणी काढून ठेवला?’ असा जाब महिलांनी पोलिसांना विचारला.
मंदिराचे ट्रस्टी याबाबत बोलणी का करीत नाहीत. त्यांनी समोर यावे. चर्चा करावी. महिलांनी कोणता पोशाख घालून देवाचे दर्शन घ्यावे, हे ठरवण्याचा अधिकार ट्रस्टींना कोणी दिला? फक्त महिलांवर असे निर्बंध घालण्यास आमचा विरोध आहे. आम्हाला बोलणी करायची आहे. त्यामुळे त्यासाठी ट्रस्टींना पाचारण करावे, अशा मागण्या ब्रिगेडच्या महिलांनी कापडे यांच्याकडे केल्या. त्यावर, कापडे यांनी आता फलक नसल्याने आंदोलनाचा प्रश्नच येत नाही. ट्रस्टींना पाचारण केले आहे. मात्र, त्यांनी येण्यास नकार दिला असल्याचे सांगितले. त्यानंतर, महिलांनी ‘भूमाता ब्रिगेडचा विजय असो,’ असा नारा देत हनुमान मंदिरात प्रवेश केला. हनुमानाचे दर्शन घेतले आणि ब्रिगेडच्या महिला त्या ठिकाणाहून निघाल्या. फलकच काढून टाकल्याने कार्यकर्ते विजयाच्या घोषणा देत तेथून निघाले. कालांतराने शिवसेनेच्या नगरसेवकाने आवाहन करून गोळा केलेला जमावही पांगला आणि आंदोलनाची सांगता झाली.
‘तो’ फलक काढला कोणी?
मॅक्सी घालून मंदिरात प्रवेश करू नये, असे लिहिलेला फलक शुक्रवारपर्यंत मंदिराच्या आवारात होता. मात्र, काळे फासले जाणार असल्याने तो अचानक नाहीसा झाला. त्याबाबत, पोलिसांना विचारणा केल्यावर त्यांनी तेथे अशा प्रकारचा कोणताही फलक नसल्याची भूमिका घेतली. तो फलक कोणी काढला, ते आम्हाला माहीत नाही, असा दावा त्यांनी केला; तर तो फलक पोलिसांनीच काढून ठेवला, असा दावा शिवसेनेचे नगरसेवक आणि मंदिराचे ट्रस्टी रमेश म्हात्रे यांनी केला.
हा प्रसिद्धीचा स्टंट - म्हात्रे
भूमाता ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्या आणि तृप्ती देसाई या हिंदू धर्माविरोधात आहेत. त्यांचा प्रसिद्धीसाठी स्टंट सुरू आहे. त्यांनी ट्रस्टींकडे विनंती केली असती, तर आम्ही तो फलक काढला असता. मुळात या परिसरातील महिलांची मॅक्सीसंदर्भातील फलकाला हरकत नाही. महिलांनी मागणी केल्यास तो काढला जाईल, अशी भूमिका आंदोलनाचा विषय संपल्यावर ट्रस्टी असलेले शिवसेनेचे नगरसेवक म्हात्रे यांनी मांडली. महाराष्ट्रात दुष्काळ आहे. भूमाता पाण्याविना कोरडी पडली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्यांना मदत करण्याचे काम भूमाता ब्रिगेडने करावे. गावदेवी मंदिरातही फलक आहे. पण, महिलांनी हनुमान मंदिरात आंदोलन केले, असा दावा त्यांनी केला. हाजी अली दर्ग्यातून पिटाळून लावलेल्या तृप्ती देसाई यांनी स्वत: कोपर गावात येऊन दाखवावे, असे आव्हान म्हात्रे यांनी दिले.