शिक्षण मंडळाचे वादग्रस्त अध्यक्ष अखेर निलंबित
By admin | Published: April 20, 2016 05:55 AM2016-04-20T05:55:17+5:302016-04-20T05:55:17+5:30
अमरावती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष महेश करजगावकर यांना शिक्षण विभागाने अखेर निलंबित केले. शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी त्यांच्या निलंबनाचा आदेश काढता
नागपूर : अमरावती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष महेश करजगावकर यांना शिक्षण विभागाने अखेर निलंबित केले. शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी त्यांच्या निलंबनाचा आदेश काढताच, त्यांच्याकडून अमरावती विभागीय शिक्षण मंडळाचा कारभार काढून घेण्यात आला. हा पदभार नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संजय गणोरकर यांना सोपविण्यात आला आहे.
महेश करजगावकर यांची कारकीर्द अतिशय वादग्रस्त ठरली आहे. ते नागपूरचे शिक्षण उपसंचालक असताना त्यांच्याविरोधात शिक्षक आमदार नागो गाणार यांनी शासनाकडे अनेक तक्रारी केल्या होत्या. सीताबर्डी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मान्यता नसलेल्या शाळेतील शिक्षकांच्या वेतनासाठी निधी मंजूर करून त्यांनी शासनाची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हासुद्धा दाखल करण्यात आला होता. शिक्षकांचा अपमान करणे, त्यांना नाहक त्रास देणे, शासनाचा आदेश नसतानाही शिक्षकांसाठी कार्यशाळा घेऊन, त्यांची गोची करणे आदी प्रकारामुळे शिक्षक त्रस्त होते. गाणार यांनी त्यांच्याविरोधात शासनाकडे तक्रारींचा पाठपुरावा केला होता.
करजगावकरचे प्रकरण विधान परिषदेतही गाजले होते. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी करजगावकरच्या निलंबनाची घोषणा सभागृहात केली होती. (प्रतिनिधी)