किसान मोर्चातून माओवाद डोकावतोय , पूनम महाजन यांचं वादग्रस्त वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2018 02:24 PM2018-03-12T14:24:50+5:302018-03-12T14:24:50+5:30
भाजपाच्या खासदार पूनम महाजन यांनी मोर्चेक-यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे
मुंबई : मजल दरमजल करत जवळपास 200 किमी पायपीट करून अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी नाशिकहून मुंबईपर्यंत काढलेला लाँग मार्च सोमवारी पहाटे 5 वाजता आझाद मैदानात धडकला. शेतकऱ्यांच्या या लाँगमार्चचे आज महाराष्ट्राच्या विधानसभेतही पडसाद उमटले. सर्व विरोधकांनी मोर्चा संयमाने येत असल्याचे कौतूक केले. पण दुसरीकडे भाजपाच्या खासदार पूनम महाजन यांनी मोर्चेक-यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. शेतक-यांच्या महामोर्चातून शहरी माओवाद डोकावतोय असं महाजन म्हणाल्या आहेत.
मुंबईपर्यंत शांततेत आलेल्या या मोर्चाबद्दल एका मराठी वृत्त वाहिनीने भाजपा खासदार पूनम महाजन यांना प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनात असलेल्या लाल झेंड्याबद्दल आक्षेप घेतला. या आंदोलनातून शहरी माओवाद डोकावताना दिसत आहे. यामध्ये लाल झेंडे घेऊन शेतकरी निघाले आहेत.' असं पूनम महाजन म्हणाल्या.
खासदार महाजन यांच्या या वक्तव्याने आंदोलनाला नक्षली रंग देण्याचा प्रयत्न झाल्याची टीका होत आहे. पूनम महाजन यांनी शेतक-यांचा अपमान केला आहे, त्यांनी शेतक-यांची माफी मागावी अशी मागणी कॉंग्रेसचे प्रदेशअध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.