महाविकास आघाडीत पुन्हा धुसफूस; आरोग्य मंत्री राजेश टोपे शिवसेनेवर नाराज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 04:29 PM2022-04-18T16:29:27+5:302022-04-18T16:51:16+5:30
राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची फोडाफोडी करू नका. महाविकास आघाडीचा धर्म पाळावा असं राजेश टोपेंनी सांगितले.
मुंबई – महाविकास आघाडीत कुठलीही नाराजी नाही असं वारंवार तिन्ही पक्षाचे नेते सांगत असले तरी अनेकदा महाविकास आघाडीतील धुसफूस बाहेर येत आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर व्यासपीठावरून शिवसेनेच्या मंत्र्यांवर नाराजी व्यक्त केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. मंत्री संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांच्याकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची फोडाफोडी होतेय असा आरोप राजेश टोपेंनी करत नाराजी व्यक्त केली आहे.
मंत्री राजेश टोपे म्हणाले की, शिवसेनेच्या मंत्र्यांकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला जातो हे सत्य आहे. त्यामुळे भुमरे असतील वा सत्तार असतील त्यांना एकच सांगतो, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची फोडाफोडी करू नका. महाविकास आघाडीचा धर्म पाळावा असं त्यांनी म्हटलं. राजेश टोपेंचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राजेश टोपेंनी नाराजी व्यक्त केली.
अलीकडेच कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत शिवसेनेने हक्काची जागा सोडत काँग्रेस उमेदवारासाठी न लढण्याचा निर्णय घेतला. मात्र २०२४ निवडणुकीत तेव्हाचं तेव्हा बघू असं सांगत या जागेवर दावा करणार असल्याचेही सूचित केले होते. राज्यात सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आले असले तरी आजही स्थानिक पातळीवर तिन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर कुरघोडी करत असल्याचं दिसून येते. आता मंत्री राजेश टोपे यांनी नाराजी व्यक्त केल्यानं महाविकास आघाडीत सगळं काही आलबेल असल्याचं दाखवून देण्यात येत असले तरी स्थानिक स्तरावर कुठेतरी नाराजी समोर येत असल्याचं दिसून येते.
काँग्रेस आमदाराची शिवसेना मंत्र्यांवर नाराजी
अलीकडेच वांद्रे पूर्व येथील काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी(Zeeshan Siddique) यांनी मंत्री अनिल परबांना खोचक सल्ला दिला होता. झिशान सिद्दीकी म्हणाले की, वांद्रे पूर्व मतदारसंघातील गोळीबार एसआरए योजनेमुळे अनेक लोकं शिवालीक बिल्डर्समुळे नाराज आहेत. वर्षोनुवर्षे हक्काचं घर मिळवण्यासाठी लोकं धडपड करत आहेत. विधानसभेतही मी हा प्रश्न विचारला. दुर्दैवाने आजपर्यंत हे उत्तर मिळालं नाही. शिवालीक बिल्डर्सवर कारवाई न करण्यासाठी कुणाचा दबाव आहे का? असा सवाल करत नुकतेच मंत्री अनिल परब स्वत:च्या हाताने २०-२५ लोकांना चाव्या वाटत आहे. मग त्या हजारो लोकांचे काय ज्यांना अद्याप घरं मिळालं नाही. जर विकासकाला चाव्या वाटायच्या असतील तर मंत्र्यांच्या हातातून वाटल्या जातात. आम्ही एसआरएसोबत बैठक घेतो तेव्हा विकासक येत नाही असा आरोप त्यांनी केला.