हरयाणा निकालानंतर मविआत भूकंप?; संजय राऊत- नाना पटोले यांच्यात शाब्दिक 'वॉर'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 12:27 PM2024-10-09T12:27:07+5:302024-10-09T12:49:06+5:30
हरयाणा निकालानंतर महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटत आहेत. महाविकास आघाडीत ठाकरे गट काँग्रेसविरोधात आक्रमक झाल्याचं दिसून येते.
मुंबई - हरयाणा निवडणुकीच्या निकालानं राज्यातील महाविकास आघाडीत संघर्ष पेटल्याची चिन्हे दिसून येत आहेत. हरयाणात भाजपानं पुन्हा एकदा एकहाती सत्ता मिळवली त्यातूनच उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून काँग्रेसवर कुरघोडी सुरू झाली आहे. मुख्यमंत्रिपदावरून ठाकरे गट आग्रही झाला आहे. हरयाणा निवडणुकीच्या निकालाचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत. हरियाणाचा पराभव हा दुर्दैवी आहे. इंडिया आघाडीचा विजय जम्मू काश्मीरमध्ये झाला. हरयाणात जर इंडिया आघाडी झाली असती, त्यात सपा, आप, एखादी जागा शिवसेना, राष्ट्रवादीला मिळाली असती तर त्याचा परिणाम निकालात झाला असता असं सांगत संजय राऊतांनी काँग्रेसला खडे बोल सुनावले आहेत.
पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, आम्ही एकतर्फी जिंकू असं काँग्रेसला वाटत आहे, जिथे काँग्रेस कमकुवत असते तिथे ती प्रादेशिक पक्षांची मदत घेते, हे भाजपाचेच धोरण आहे आणि जिथं काँग्रेसला वाटतं आपण मजबूत आहोत तिथे ते स्थानिक प्रादेशिक पक्षांना महत्त्व देत नाहीत. या सगळ्याचा परिणाम हरयाणासारख्या निकालात झाला. हरयाणासारख्या राज्यात भाजपा विजयी होईल असं सांगणारा कुणी एकही व्यक्ती अथवा पत्रकार भेटला नाही. हरयाणातील पराभव दुर्दैवी असला तरी त्यातून आम्हाला काही गोष्टी शिकाव्या लागतील. देशातील निवडणुका आम्हाला एकत्रितच लढाव्या लागतील. कुणी स्वत:ला मोठा भाऊ, छोटा भाऊ समजू नये. लोकसभेतील यश इंडिया आघाडीचे आहे असं त्यांनी सांगत काँग्रेसला अप्रत्यक्षपणे टोला लगावला.
तसेच हरयाणाच्या निकालाचा कुठलाही परिणाम महाराष्ट्रात होणार नाही. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिघांची महाविकास आघाडी आहे. याठिकाणी उद्धव ठाकरे, शरद पवारांसारखे नेतृत्व जागरुक आहे. हरयाणाचा विजय फार मोठा देदीप्यमान विजय नाही. ठिकठिकाणी अपक्षांनी मते घेतली. आमच्या मतांचे विभाजन झाले. भाजपाने ते ठरवून केले. शेवटी जिंकतो त्याचे अभिनंदन, देशात लोकशाही आहे. काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे काही आक्षेप घेतलेत त्यावर आयोगाने निर्णय घेतला पाहिजे. परंतु जणुकाही देवेंद्र फडणवीस हरयाणात गेलेत, तिथे विजय मिळवून दिलाय असं नाही. ९० जागांची विधानसभा आहे, काही जातीपातीचं राजकारण असते तरीही काँग्रेसला ३६ जागा मिळाल्यात, बहुमताला ४५ लागतात, केवळ ९ जागा कमी पडल्यात. आम्ही निराश झालेलो नाही. काँग्रेस पक्षाला भूमिका घ्यावी लागेल. जर काँग्रेसला स्वबळावर लढायचं असेल तर तशी त्यांनी भूमिका घेतली पाहिजे मग इतर पक्ष आपापल्या राज्यात त्यांची भूमिका घेतील असा इशाराही संजय राऊतांनी दिला आहे.
दरम्यान, संजय राऊत काय बोलतात, काय लिहितात त्यावर आम्ही लक्ष देत नाही. हरियाणा आणि महाराष्ट्र हा फरक ज्यांना कळत नसेल तर हा त्यांचा विषय आहे. मी संजय राऊतांवर जास्त प्रतिक्रिया देत नाही. वेळ आल्यावर प्रतिक्रिया देईन. जे होतं ते चांगल्यासाठी होतं असं समजून चालायचं. आजच्या बैठकीत राऊतांशी बोलू, अग्रलेख वस्तूस्थितीला धरून होता की मुद्दामून लिहिला ते विचारू. आपण जे समन्वयाने महाराष्ट्रात काम करतोय त्यातून चांगला संकेत जावा हा राऊतांना सल्ला आहे. सुरुवातीपासून महाराष्ट्रात मेरिटप्रमाणेच जागावाटप व्हावं अशी आमची भूमिका आहे. त्यानुसारच काम सुरू आहे. ठाकरे-पवार नेतृत्व जागरूक आहे हे संजय राऊतांना का बोलावं वाटतं हा प्रश्न आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी राऊतांच्या विधानावर दिली आहे.