स्प्रिंग मिल पुनर्विकासाचा वाद चिघळला
By Admin | Published: February 9, 2015 05:53 AM2015-02-09T05:53:44+5:302015-02-09T05:53:44+5:30
अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेला नायगांव येथील स्प्रिंग चाळींच्या पुनर्विकासाचा वाद पुन्हा एकदा रविवारी भर कार्यक्रमात चिघळला
मुंबई : अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेला नायगांव येथील स्प्रिंग चाळींच्या पुनर्विकासाचा वाद पुन्हा एकदा रविवारी भर कार्यक्रमात चिघळला. सलग २५ वर्षे या मतदारसंघातून निवडून आलेले आमदार कालिदास कोळंबकर यांनी या चाळींच्या पुनर्विकासासाठी काहीच केले नसल्याचा आरोप येथील रहिवाशांनी कार्यक्रमात केला व कोळंबकर समर्थक व स्थानिकांमध्ये जुंपली.
बॉम्बे डाइंग मिलतर्फे राज्याच्या धोरणानुसार नायगाव येथे पालिकेच्या जागेवर संयुक्त महाराष्ट्र हुतात्मा स्मारक उभारण्यात येणार आहे. त्याच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, आमदार अजय चौधरी, आमदार सदा सरवणकर आदी उपस्थित होते. या वेळी कोळंबकर यांनी, आपण कसे शिवसैनिक आहोत आणि बाळासाहेबांचे स्वप्न साकार करण्यास कसा हातभार लावला याचा पाढा वाचला. त्यांच्या कथनी - करणीच्या फरकामुळे स्थानिक नाराज होते. त्यातच त्यांनी या उद्यानाच्या जागेवर चाळीतील रहिवाशांना घरांसाठी जागा मिळावी, यासाठी २२ वर्षे प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. त्यामुळे काही रहिवाशांनी याला विरोध केला. त्यामुळे समर्थक आणि स्थानिकांमध्ये बाचाबाची झाली. भूमिपूजनाचा कार्यक्रम आणि स्प्रिंग मिल
चाळीतील रहिवाशांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नाबाबत आपल्याला काही तरी ठोस उत्तर मिळेल, म्हणून जमा झालेल्या चाळकऱ्यांचा भ्रमनिरास झाला. (प्रतिनिधी)