छत्रपती संभाजीराजेंवर केलेल्या 'त्या' विधानावरून वाद; जितेंद्र आव्हाडांच्या कारवर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 04:34 PM2024-08-01T16:34:56+5:302024-08-01T16:39:53+5:30
विशालगडावर झालेल्या आंदोलनावर टीका करताना जितेंद्र आव्हाडांनी संभाजीराजेंवर जोरदार टीका केली होती.
मुंबई - राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड हे ठाण्याच्या दिशेने जात असताना त्यांच्या कारवर काही कार्यकर्त्यांनी हल्ला केला आहे. छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य संघटनेचे हे कार्यकर्ते असल्याचं बोललं जातं. संभाजीराजेंना आता छत्रपती म्हणण्याचा अधिकार नाही असं विधान आव्हाडांनी केले होते. त्यामुळे स्वराज्य संघटनेकडून जितेंद्र आव्हाडांना धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आज हा हल्ला झालेला आहे.
मुंबईत आज जितेंद्र आव्हाडांची पत्रकार परिषद होती. ही पत्रकार परिषद संपल्यानंतर आव्हाड त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी निघाले होते. त्यावेळी वाटेत वाहतूक कोंडीत आव्हाडांची कार अडकली असता त्यावेळी हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाडांची कार वेगाने पुढे नेण्यात आली. या हल्ल्याची जबाबादारी स्वराज्य संघटनेने घेतली आहे.
संभाजीराजे यांच्याबद्दल बेताल वक्तव्य जितेंद्र आव्हाडांनी केली. तू मर्द असता तर पळाला नसता, तू पळपुटा आहेस हे महाराष्ट्राला कळालं आहे असं विधान स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्याने केले आहे. विशेष म्हणजे पोलिसांचं वाहन जितेंद्र आव्हाडांच्या कारमागे होते. त्यावेळी शेजारून आलेल्या वाहनातून हे कार्यकर्ते उतरले आणि त्यांनी हातातील बांबूच्या सहाय्याने आव्हाडांच्या गाडीवर हल्ला केला. त्यावेळी कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणत घोषणा दिल्या. विशालगडावर संभाजीराजे यांनी जे आंदोलन केले होते त्यावर जितेंद्र आव्हाडांनी नापसंती व्यक्त केली होती.
काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?
संभाजीराजेंनी आता छत्रपती म्हणणं सोडून द्यावं. त्यांना जो अधिकार होता, शाहू महाराजांची जी वंश परंपरा होती, त्या वंशाचं रक्त संभाजीराजे पुढे घेऊन जात होते. त्यांच्या रक्तात काय होते आणि संभाजीराजेंच्या रक्तात काय हे तपासण्याची गरज आहे. शाहू महाराजांच्या घराण्यातील वारस असलेला व्यक्ती असं विधान करतो, ज्यामुळे दंगल होऊ शकते तो शाहू महाराजांचा वारस होऊच शकत नाही असं विधान जितेंद्र आव्हाडांनी विशालगडावरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केले होते.
राज्यात कायद्याचा प्रश्न, राजीनामा द्यावा - काँग्रेस
महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही इतका कायदा सुव्यवस्था बिघडला नाही. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असतानाही हे सगळं होतंय. राज्यात कायद्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिली.