‘एमआयएम’ आमदाराच्या वक्तव्यावरून वादंग
By admin | Published: December 2, 2015 02:03 AM2015-12-02T02:03:50+5:302015-12-02T02:03:50+5:30
एमआयएमचे औरगांबाद येथील आमदार इम्तियाज जलील यांनी एका वृत्तवाहिनीवर बोलताना राष्ट्रगीताबाबत केलेल्या कथित वक्तव्यावरून वादंग उठले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने
मुंबई : एमआयएमचे औरगांबाद येथील आमदार इम्तियाज जलील यांनी एका वृत्तवाहिनीवर बोलताना राष्ट्रगीताबाबत केलेल्या कथित वक्तव्यावरून वादंग उठले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने
मंगळवारी दादर येथील शिवसेना भवनासमोर निषेध मोर्चा काढला. जलील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली.
आमदार जलील यांनी सोमवारी एका मराठी वृत्तवाहिनीवरील चर्चेत सहभाग घेताना राष्ट्रगीताला उद्देशून ‘नौटंकी’ शब्द उच्चारल्याचा आक्षेप घेत मनसेने हे आंदोलन केले. मात्र त्यासाठी नेमकी शिवसेना भवनासमोरील जागा निवडल्याने त्यामागील ‘राज’कारणाचीही चर्चा सुरु राहिली. आपले भाष्य मोडतोड करून वापरले जात असल्याचे स्पष्टीकरण इम्तियाज जलील यांनी दिले आहे. राष्ट्रगीतासाठी आपण नौटंकी असा शब्दप्रयोग केला नव्हता, तर मनसेला नौंटकी म्हटल्याचे त्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
काय आहे नेमके प्रकरण?
कुर्ला पश्चिमेकडील फिनिक्स मॉलमधील पीव्हीआरमध्ये ‘तमाशा’ चित्रपटाच्या एका शो पूर्वी राष्ट्रगीत सुरू असताना एक कुटुंब खुर्चीवर बसून राहिले होते. त्यामुळे अन्य प्रेक्षकांनी त्यांच्या कृतीचा निषेध करीत त्यांना चित्रपटगृहातून बाहेर काढले होते. याबाबतचा व्हिडीओ सोशल मिडीयावर ‘व्हायरल’ झाल्यानंतर त्याबाबत उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या.
या पार्श्वभूमीवर सोमवारी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत मनसेचे अमेय खोपकर व आमदार जलील यांच्यात शाब्दिक वाद झाला होता. त्यानंतर मंगळवारी मनसेने त्यांच्या कथित वक्तव्याबाबत आंदोलन केले. एमआयएम पक्षाचा प्रतिकात्मक झेंडा जाळण्यात आला. तसेच शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात इम्तियाज जलील यांच्यावर या प्रकरणी राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.