सरन्यायाधीशांच्या शपथविधीला एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीवरुन वाद? उज्ज्वल निकम म्हणतात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 02:06 PM2022-09-13T14:06:41+5:302022-09-13T14:08:02+5:30
जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या दिल्ली दौऱ्यावरुन टिका केली होती.
मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी औरंगाबाद दौऱ्यातील सभेत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. राष्ट्रवादीच्या नेत्यांसह ठाकरे गटातील शिवसेना नेत्यांवरही त्यांनी तोफ डागली. मंत्री संदीपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघात मुख्यमंत्री शिंदे यांची सभा झाली. प्रामुख्याने मुख्यमंत्री शिंदे यांनी भाषणा दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. जयंत पाटील यांनाही, कसं काय पाटील बरं हाय का... असे म्हणत टोमणा मारला. तसेच, सरन्यायाधीशांच्या शपथविधी सोहळ्याला गेल्यावरुन केलेल्या टिकेला प्रत्युत्तरही दिलं. आता, या वादावर ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी आपल मत नोंदवलं आहे.
जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या दिल्ली दौऱ्यावरुन टिका केली होती. दिल्लीत सरन्यायाधीशांच्या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाणं योग्य नसल्याचं ते म्हणाले. तसेच, सध्या शिवसेना आणि शिंदे सरकार यांच्याशी संबंधित खटले सर्वोच्च न्यायालयात सुरु आहेत. यासंदर्भात स्वतंत्र खंडपीठही नेमण्यात आलं असून ते सरन्यायाधीश लळित यांच्या मार्गदर्शनात नेमण्यात आलं आहे. त्यामुळे, मुख्यमंत्री शिंदेंनी या सोहळ्याला जाणे उचित नसल्याची टिका विरोधकांनी केली होती. विरोधकांच्या टिकेला मुख्यमंत्री शिंदेंनी औरंगाबादेतून प्रत्युत्तर दिलंय. त्यानंतर, आता उज्ज्वल निकम यांनीही आपलं मत व्यक्त केलं.
“एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आले होते. आत्तापर्यंतचा प्रघात आहे की भारतातील सर्व न्यायाधीशांचा ज्यावेळी सत्कार होत असतो त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून नेते उपस्थित राहतात. उगाच त्यामधून अर्थ आणि गैरअर्थ काढणं योग्य नाही,” असं निकम यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात टीव्ही ९ वेबसाईटने वृत्त प्रकाशित केलं आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे
एक मराठी माणूस एवढ्या मोठ्या पदावर विराजमान होत आहे, त्यांचं अभिनंदन करायला आम्ही गेलो होते. विशेष म्हणजे या सोहळ्याचं आम्हाला आमंत्रणही होते. विरोधी पक्षनेत्यांनाही आमंत्रण होतं, असेही शिंदे यांनी म्हटले. त्यानंतर, पाटील यांच्यावर टीकाही केली.
एक मराठी माणसाने स्वकर्तृत्वाच्या बळावर सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी निवड होणे याचा मला सार्थ अभिमान आहे. यानिमित्ताने त्यांना भेटून त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान करण्याची संधी मला प्राप्त झाली ही निश्चितच आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. pic.twitter.com/9fvsQVf6ej
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 11, 2022