३० हजार शिक्षकांच्या नोकरीवर गंडांतर? आधार प्रमाणीकरणात अतिरिक्त ठरण्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 07:41 AM2023-06-23T07:41:47+5:302023-06-23T07:42:05+5:30
राज्य सरकारने गेल्या वर्षी शाळांना अनुदान मंजूर करताना विद्यार्थ्यांच्या आधार प्रमाणीकरणावर प्रत्येक शाळेची संचमान्यता मंजूर करण्यास सांगितले आहे.
जळगाव : विद्यार्थ्यांच्या आधार प्रमाणीकरणाचा शेवटचा टप्पा शिक्षण संस्थांसाठी अडचणीचा ठरत असून, राज्यातील ३० हजार शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती आहे. त्यामुळे आधारला पर्यायी व्यवस्था शिक्षण विभागाने स्वीकारावी, अशी मागणी संस्थाचालक करत आहेत. राज्याच्या आकडेवारीनुसार अजूनही ७,१०,६३२ विद्यार्थ्यांचे आधार मॅच झालेले नाही आणि ३,१८,९६६ विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही.
राज्य सरकारने गेल्या वर्षी शाळांना अनुदान मंजूर करताना विद्यार्थ्यांच्या आधार प्रमाणीकरणावर प्रत्येक शाळेची संचमान्यता मंजूर करण्यास सांगितले आहे. त्यासाठी १५ जून २०२३ अंतिम मुदत होती; पण आजही प्रमाणीकरणाचे १०० टक्के काम झालेले नाही. त्यामुळे अंतिम संचमान्यता निघालेल्या नाहीत. आधारनुसार विद्यार्थीसंख्या गृहित धरल्यास ३० हजारपेक्षा अधिक शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ कार्यकारिणीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत हा मुद्दा गाजला.
राज्य सरकार आधार प्रमाणीकरणाचा आग्रह धरत असल्याने २४ लाख विद्यार्थी संच मान्यतेच्या बाहेर जातील, त्या तुलनेत शिक्षक अतिरिक्त ठरतील. यामुळे नवीन शिक्षक भरतीदेखील अडचणीत येणार असल्याच्या मुद्द्याकडे काही पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले आहे. रिक्त असलेली चार ते पाच हजार पदे भरून त्यांना शाळांमध्ये तपासणी करायला पाठवा, अशीही मागणी होत आहे.
अडचणी समजून घेणार तरी केव्हा...
माजी मंत्री विजय नवल पाटील म्हणाले, की शाळा प्रवेशात आधारचा संबंध जोडू नका, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्ण पीठाने दिला आहे. आधार प्रमाणीकरणात अडचणी येत आहेत.
विद्यार्थ्यांचे फोटो नसतात, काहींच्या अंगठ्याचे ठसे उमटत नाहीत, पालकांकडे मोबाइल नसतात. ग्रामीण भागात लहान मुलांचे आधार जन्मल्याबरोबर निघत नाही. त्यामुळे शिक्षकांना अडचणी येतात.
राज्यात आधारची स्थिती
आधारनुसार विद्यार्थी २,०८,७३,६६८
आधार नसलेले विद्यार्थी ३,१८,९६६
अवैध आधार ८,९५,६३७
मिसमॅच आधार ७,१०,६३२
वैध आधार % ९०.९२
शिक्षण विभागात ७० टक्के पदे रिक्त आहेत, ती भरावीत. विद्यार्थ्यांची शहानिशा करून त्यांची संख्या ठरवा.
- विजय नवल पाटील, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ