Jitendra Awhad Arrested : हर हर महादेव सिनेमासंदर्भातील वाद, जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांकडून अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 03:42 PM2022-11-11T15:42:02+5:302022-11-11T15:42:15+5:30
मंगळवारी ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात जितेंद्र आव्हाडांसह १०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ठाणे - हर हर महादेव या मराठी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीची माहिती दाखवली आहे, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी काही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन रात्री दहा वाजण्याच्या सुमारास विवियाना मॉल येथील शो बंद पडला होता. यावेळी चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या एका दर्शकाने चित्रपटाचे पैसे परत मागितले, तसेच कोण जितेंद्र आवड असा सवाल केल्याने, संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या दर्शकाला मारहाण केली होती. यानंतर मंगळवारी ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात जितेंद्र आव्हाडांसह १०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर आज आव्हाडांना वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे.
यासंदर्भात स्वतः आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका पाठोपाठ एक असे तीन ट्विट केले आहेत, यात त्यांनी लिहिले आहे, "आज दुपारी साधारण 1 वाजता मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या असे ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. मी म्हटलं कि, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो."
आज दुपारी साधारण 1 वाजता मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या असे ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. मी म्हटलं कि, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 11, 2022
पुढील ट्विटमध्ये आव्हाड म्हणाले, "मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेहऱ्यावरती अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले कि, मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत. तुम्हांला अटक करावी लागेल."
फाशी दिली तरी चालेल, पण...-
यासोबतच आणखी एका ट्विटमध्ये आव्हाड म्हणाले, "हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही, तो मी गुन्हा कबूल करणार नाही."
हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 11, 2022