मराठा मोर्चातील मोर्चेकऱ्यांसाठी शिवसेनेकडून न्याहारीची सोय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2017 08:25 AM2017-08-09T08:25:04+5:302017-08-09T10:24:56+5:30
मुंबईतून निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी शिवसेनेने यंदा उघडपणे आपला सहभाग दाखविला आहे.
मुंबई, दि. 9- मुंबईतून निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी शिवसेनेने यंदा उघडपणे आपला सहभाग दाखविला आहे. मुंबईतील मराठा मोर्चासाठी राज्यभरातून येत असलेल्या मोर्चेकऱ्यांसाठी बुधवारी सकाळी सहा वाजल्यापासून पक्षातर्फे न्याहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. ठाण्यातील आनंदनगर जकात नाक्यावर तब्बल ७० हजार मोर्चेकऱ्यांना पुरतील इतके वडापाव आणि चहाची व्यवस्था करण्यात आली आहे, तर नवी मुंबईतील करावे येथील तांडेल मैदानावर ३५ हजार थाळी कांदेपोहे मागविण्यात आले आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामात लक्ष घातलं असून ठाणे महापालिकेतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही आवश्यक मनुष्यबळ उभं केलं आहे. या मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्या मोर्चेकऱ्यांसाठी खास सोय आहे. मोर्चात सहभागी होणाऱ्यांचे खाण्यापिण्याचे हाल होऊ नये म्हणून ही सुविधा उपलब्ध करून दिली असल्याचं बोललं जातं आहे.
मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा समाजाच्यावतीने बुधवारी मुंबईत निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी तब्बल २५ लाखांहून अधिक समाजबांधव सहभागी होतील, असा दावा मुंबई समन्वय समितीने केला आहे. यापूर्वी राज्यभर निघालेल्या मराठा मोर्चा मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता बुधवारी मुंबईत निघणाऱ्या या मोर्चाकडे संपूर्ण देशाच लक्ष लागलं आहे.
राज्यभरात आतापर्यंत निघालेल्या मराठा मोर्चात सर्वपक्षीय मराठा नेत्यांनी सहभाग घेतला होता. पण विशेष म्हणजे आत्तापर्यंत झालेल्या 57 मोर्चात कुठलंही राजकीय भाषण झालं नाही. बुधवारी सकाळपासूनच मराठा समाजबांधव मुंबईच्या दिशेने येणार आहेत. हे लक्षात घेऊन मुंबई-ठाण्याच्या वेशीवर असलेल्या आनंदनगर जकात नाका येथे शिवसेनेने मोर्चेकऱ्यांसाठी वडापाव आणि चहाची खास व्यवस्था केली असून गेल्या दोन दिवसांपासून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना येथील व्यवस्थेच्या कामाला लावलं आहे. नवी मुंबईत करावे येथील तांडेल मैदानात मोर्चेकऱ्यांसाठी कांदापोहे, चहाची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी शिवसेनेचे स्थानिक नेते विजय चौगुले यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.