राज्यामध्ये सोयीची राजकीय सोयरीक!
By admin | Published: March 15, 2017 04:33 AM2017-03-15T04:33:44+5:302017-03-15T04:33:44+5:30
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीत एकमेकांविरुद्ध दंड थोपटून मैदानात उतरलेल्या सर्वच राजकीय पक्षांनी पंचायत समित्यांच्या सभापती, उपसभापती निवडीत मात्र गळ्यात गळे
मुंबई : नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीत एकमेकांविरुद्ध दंड थोपटून मैदानात उतरलेल्या सर्वच राजकीय पक्षांनी पंचायत समित्यांच्या सभापती, उपसभापती निवडीत मात्र गळ्यात गळे घालून सोयीनुसार राजकीय सोयरिका केल्या आहेत.
मराठवाड्यात भारतीय जनता पार्टीला दूर ठेवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आले असून, पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी राष्ट्रवादी-भाजपा तर नाशिक जिल्ह्यात सर्वच पक्ष एकमेकांसोबत आले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील हा सर्वपक्षीय पॅटर्न आगळाच म्हणावा लागेल.
काँग्रेससोबत युती करत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात शिवसेनेची खेळी यशस्वी झाली. औरंगाबाद पंचायत समितीच्या सभापतीपदावर काँग्रेसच्या करमाड गणातील ताराबाई उकिर्डे या विराजमान झाल्या, तर उपसभापतीपदासाठी शिवसेनेच्या गांधेली गणातील कविता राठोड यांची वर्णी लागली. तर कन्नडमध्ये शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली आहे. जालना पंचायत समितीसाठी शिवसेना, काँग्रेस युती होऊन सभापतीपदी शिवसेनेचे पांडुरंग डोंगरे तर उपसभापती काँग्रेसच्या द्वारकाबाई खरात यांची निवड झाली. ही नवीन राजकीय आघाडी चर्चेचा विषय ठरत आहे. उमरग्यात काँग्रेस आणि भाजपाची मैत्री अधिक घट्ट झाली असून, या दोघांनी एकत्रित येवून पंचायत समितीत सत्ता काबीज केली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
..............
नवा नाशिक पॅटर्न
नाशिक जिल्ह्यातील पाच पंचायत समित्यांमध्ये दोन भिन्न विचारसरणीच्या पक्षांनी परस्परांच्या गळ्यात गळे घालत सत्ता काबीज केल्याने पक्षीय सामिलकीचा नवा नाशिक पॅटर्नच निर्माण झाला आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसने माकपाशी युती करुन आपल्या पदरात उपसभापतीपद पाडून घेतले आहे. देवळा पंचायत समितीत राष्ट्रवादीला शिवसेनेची साथ मिळाली असून दिंडोरी पंचायत समितीमध्ये कॉँग्रेसने शिवसेनेसमोर नांगी टाकत त्यांच्यासोबत थेट गट नोंदणी करुन उपसभापतीपद पदरात पाडून घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
....................
अकोल्यात लाठीमार
अकोले पंचायत समितीत (जि. अहमदनगर) राष्ट्रवादीचे मधुकर पिचड यांनी शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा देत भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. त्यामुळे अकोल्यात सेना-भाजपमध्ये राडा झाल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. जिल्ह्यात सर्वाधिक चार पंचायत समित्यांवर भाजपचे सभापती झाले आहेत. राष्ट्रवादी व कॉंग्रेसला प्रत्येकी तीन, सेनेला दोन, महाआघाडीला एक, तर गडाख यांच्या शेतकरी क्रांती पक्षाला एक सभापतीपद मिळाले आहे. तीन ठिकाणी प्रस्थापित घराणी सत्तेवर बसली आहेत.
................
..................
साताऱ्यात ‘सब कुछ राष्ट्रवादी’
सातारा जिल्ह्यातील अकराही पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीच्या सदस्यांची वर्णी लागली. खंडाळा पंचायत समितीच्या उपसभापतीपदी काँग्रेस तर कऱ्हाडच्या उपसभापतिपदी कऱ्हाड विकास आघाडीचा सदस्य विराजमान झाला. उर्वरित सर्व ठिकाणी राष्ट्रवादीचाच गजर झाला आहे.