अधिवेशनाची तारीख ७ की ११ डिसेंबर? समितीच्या बैठकीत आज अंतिम निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 10:59 AM2023-11-29T10:59:33+5:302023-11-29T11:01:33+5:30
Maharashtra Assembly Winter Session: राज्य विधिमंडळाचे अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू होणार की ११ डिसेंबरपासून याबाबतचा गोंधळ कायम आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बुधवारी होणाऱ्या बैठकीत तारखेबाबतचा अंतिम निर्णय होईल.
मुंबई - राज्य विधिमंडळाचे अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू होणार की ११ डिसेंबरपासून याबाबतचा गोंधळ कायम आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बुधवारी होणाऱ्या बैठकीत तारखेबाबतचा अंतिम निर्णय होईल.
विधिमंडळाच्या मुंबईत झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी नागपूरचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू होईल, अशी घोषणा झाली होती. मात्र, गेल्या आठवड्यात अशी चर्चा सुरू झाली, की अधिवेशन ११ डिसेंबरपासून सुरू होईल. ११ पासून अधिवेशन घेतले तर पहिला दिवस शोकप्रस्तावात जाईल. दुसऱ्या दिवशी आरक्षण आदी विषयांवर गोंधळ होण्याची शक्यता आहे. म्हणजे प्रत्यक्ष अधिवेशन सुरू होईल ते १३ डिसेंबरपासून. २० डिसेंबरला अधिवेशन संपविले तर केवळ आठ दिवसांचे अधिवेशन होईल. विदर्भाच्या तोंडाला पाने पुसण्याचा हा प्रकार असेल, अशी टीका आता सुरू झाली आहे.
आरक्षणावर चर्चा होणार : नीलम गोऱ्हे
नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहात आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होईल. मात्र, ती कोणत्या दिवशी होईल, हे निश्चत झाले नाही. त्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील. या चर्चेत सकारात्मक तोडगा निघावा, अशी अपेक्षा असल्याचे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. विधानभवनातील सभागृहात मंगळवारी बैठकीत डॉ. गोऱ्हे यांनी आढावा घेतला. बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
कामकाजाला कात्री?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार विदर्भाचे असताना नागपूर अधिवेशनाला कात्री लावली जाते का, याबाबत उत्सुकता आहे.