संमेलनासाठी ‘नियमावली’
By admin | Published: July 31, 2015 02:28 AM2015-07-31T02:28:27+5:302015-07-31T02:28:27+5:30
संमेलन मग ते कुठलेही असो, त्याच्या आयोजनामध्ये असंख्य अडचणी निर्माण होतात आणि मग आयोजकांनाच टीकेचे धनी व्हावे लागते. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी नाट्य परिषदेच्या
पुणे : संमेलन मग ते कुठलेही असो, त्याच्या आयोजनामध्ये असंख्य अडचणी निर्माण होतात आणि मग आयोजकांनाच टीकेचे धनी व्हावे लागते. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेने नाट्य संमेलनाचा अभ्यास करण्यासाठी दोन सदस्यांची नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर नियमावली तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. दरवर्षी संंमेलनासाठी शासनाकडे हात न पसरता स्वबळावर संमेलन घेण्यासंबंधी देखील नाट्य परिषद विचार करीत आहे.
ज्या भागात संमेलन आयोजित केले जाते, तिथे मोघम स्वरूपात पहाणी केले जाते आणि मग संमेलनाचे स्थळ निश्चित केले जाते. मात्र संमेलनाला प्रारंभ झाल्यानंतर अनेक अडचणी समोर येतात आणि मग आयोजनावरच प्रश्नचिन्ह उभे रहाते. अगदी निवास, भोजन इथपर्यंत मुद्दे उपस्थित केले जातात. या गोष्टींना कुठेतरी आळा बसावा आणि संमेलनाच्या आयोजनाची घडी व्यवस्थित बसावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मुंबई नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी दिली.
संमेलन कसे करावे, त्याचे नियोजन कसे करावे, याची नियमावली देखील नाट्य परिषदेकडून तयार केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय बेळगाव नाट्य संमेलनाच्या वेळी राज्याचे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी संमेलनासाठी किती वर्ष शासनाकडे हात पसरणार? स्वबळावर संमेलन करण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजेत, हा मुद्दा उपस्थित करून आयोजकांची चांगलीच कानउघाडणी केली होती. ती गोष्ट गांभिर्याने घेऊन संमेलनासाठी शासनाकडे झोळी न पसरता स्वबळावर संमेलन घेण्याच्या दृष्टीने नाट्य परिषदेने विचार सुरू केला आहे.
बेळगाव संमेलनासाठी अतिरिक्त २५ लाख रुपये मिळावेत, अशी मागणी केली होती. मात्र अंदाजपत्रकात याविषयी कोणतीच तरतूद केली नसल्याने अद्याप परिषदेला ही रक्कम मिळू शकलेली नाही. यासंदर्भात अर्थमंत्री सुधीर मनगुंटीवर अंतिम बैठक सोमवारी होणार आहे.