आफ्रिकी विद्यापीठांना शैक्षणिक सहकार्य करणार
By Admin | Published: September 28, 2016 02:19 AM2016-09-28T02:19:28+5:302016-09-28T02:19:28+5:30
महाराष्ट्र शैक्षणिकदृष्ट्या देखील प्रगत असून आफ्रिकेतील अनेक देशांतील विद्यार्थी राज्यात उच्च शिक्षण घेत आहेत. राज्यातील विद्यापीठांचा कुलपती या नात्याने महाराष्ट्र
मुंबई : महाराष्ट्र शैक्षणिकदृष्ट्या देखील प्रगत असून आफ्रिकेतील अनेक देशांतील विद्यार्थी राज्यात उच्च शिक्षण घेत आहेत. राज्यातील विद्यापीठांचा कुलपती या नात्याने महाराष्ट्र तसेच आफ्रिकेतील विद्यापीठांमध्ये सहकार्य वाढविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन राज्यपालांनी मंगळवारी दिले.
इंडो आफ्रिकन चेंबर आॅफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीने आयोजित केलेल्या ‘आय फॉर आफ्रिका’ या चार दिवसांच्या व्यापारविषयक चर्चासत्र व प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे झाले त्या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्र देशातील आघाडीचे औद्योगिक राज्य असून परकीय गुंतवणुकीच्या दृष्टीने सर्वाधिक पसंतीचे राज्य आहे.
भारत आणि आफ्रिकन देशामधील संबंध पूर्वापार चालत आले असून महात्मा गांधींनी स्वातंत्र्य आणि न्यायासाठीचा लढा आफ्रिकेतून सुरू केल्यामुळे भारताला आफ्रिकेबद्दल तसेच तेथील लोकांबद्दल विशेष आस्था आहे. भारत आणि आफ्रिकेला मोठ्या प्रमाणात युवा लोकसंख्या लाभली असून आज कृषी, मानव संसाधन विकास, पर्यटन आदी क्षेत्रांत सहकार्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. या पार्श्वभूमीवर उभयपक्षी व्यापार वाढल्यास त्याचा फायदा भारत आणि आफ्रिकेतील नागरिकांना होईल, असेही राज्यपाल म्हणाले.(प्रतिनिधी)