पक्षांमध्ये सामंजस्य असणे म्हणजे फिक्सिंग नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 05:36 AM2018-07-13T05:36:18+5:302018-07-13T05:43:32+5:30
सत्तारूढ व विरोधी पक्ष हे एकमेकांचे विरोधक आहेत. शत्रू नाहीत. अनेक राज्यात तर मारामाऱ्या होतात. येथे मात्र प्रत्येक जण सभागृहात आपली मते खंबीरपणे मांडून आपापल्या भूमिका प्रामाणिकपणे बजावतात व सभागृह संपल्यावर आपले वैयक्तिक संबंध नीट राहिले पाहिजे याकडेही लक्ष देतात. ही सुदृढ परंपरा अशीच जपली पाहिजे.
नागपूर : प्रत्येक पक्षाच्या भूमिका वेगवेगळ्या आहेत. त्या त्या रोलमध्ये गेल्यावर राज्यासाठी आवश्यक तेच करण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. येथे सत्तारूढ व विरोधी पक्ष हे एकमेकांचे विरोधक आहेत. शत्रू नाहीत. अनेक राज्यात तर मारामाऱ्या होतात. येथे मात्र प्रत्येक जण सभागृहात आपली मते खंबीरपणे मांडून आपापल्या भूमिका प्रामाणिकपणे बजावतात व सभागृह संपल्यावर आपले वैयक्तिक संबंध नीट राहिले पाहिजे याकडेही लक्ष देतात. ही सुदृढ परंपरा अशीच जपली पाहिजे. पक्षांमध्ये सामंजस्य असू शकते. याचा अर्थ त्यांच्यात फिक्सिंग आहे, असा होत नाही. जर कुणी फिक्सिंग केले तर ते शंभर टक्के लक्षात येते. लपून राहत नाही, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे विधानसभा आणि विधान परिषदेत सर्वाेत्कृष्ट कार्य करणाºया आमदारांना ‘लोकमत विधिमंडळ पुरस्कार’ देऊन गुरुवारी सन्मानित करण्यात आले. सोबतच विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात गौरवास्पद काम करणारे व अनेक वर्षे सातत्याने विधिमंडळाचा सन्मान वाढविणारे विधान परिषदचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांना गौरविण्यात आले.
वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित या सोहळ्यात मंचावर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, प्रसिद्ध विधिज्ञ अॅड. उज्ज्वल निकम, लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा, लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मी १५ वर्षे विरोधी पक्षात होतो. पण मंत्र्यांशी वैयक्तिक संबंध वाईट नव्हते. माझी विरोधी पक्षनेते विखे पाटलांसह सर्वांशी मैत्री आहे. यात चुकीचे काहीच नाही. आम्ही सभागृहात लढू, पण खासगीत मित्र आहोत. आम्ही एका टेबलवर बसून जेवू शकतो. ही खरी लोकशाही आहे. साडेतीन वर्षांत विखे पाटील हे कधीही आपल्याकडे वैयक्तिक कामासाठी आले नाहीत. पक्षाच्या, आमदारांच्या कामासाठीच आले. लोकशाहीची ही सुदृढ परंपरा संपू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सोहळ्याला विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार डॉ. विकास महात्मे पेनीनसुला हॉटेलचे सतीश शेट्टी, ब्राईट आऊटडोअर मीडिया प्रा. लि.चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक योगेश लखानी यांच्यासह राज्यभरातील खासदार, आमदार, माजी मंत्री, माजी आमदार, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी लोकमतचे समूह संपादक दिनकर रायकर, नागपूर आवृत्तीचे संपादक दिलीप तिखिले यांनी मान्यवरांचे स्वागत केले. समारंभाचे संचालन लोकमतमुंबईचे वरिष्ठ सहायक संपादक अतुल कुलकर्णी यांनी केले. लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे निवासी संपादक गजानन जानभोर यांनी आभार मानले.
विधिमंडळाने उत्तम कायदे दिले
विधिमंडळात गोंधळ ही मोठी बातमी होते. तासन्तास चालणाºया चर्चा ही लहान बातमी होते. बहुतांश वेळी विधेयके, महत्त्वाच्या प्रश्नांवर रात्री उशिरापर्यंत तासन्तास चर्चा होते. विधानसभेला तर जेवणाचीही सुटी नसते. सकाळी ९.३० पासून ते रात्री १२.३० पर्यंत सतत काम केल्याचीही उदाहरणे आहेत. एखादवेळी एखादे एका ओळीचे विधेयक गोंधळात मंजूर होते.
पण महत्त्वाच्या विधेयकांवर एका वेगळ्या उंचीची चर्चाही होते. विरोधी पक्षात असताना विधानसभेत व्हॅटच्या विधेयकावर आपण तीन तास व एकनाथ खडसे सात तास बोलले होते. तेवढेच अभ्यासपूर्ण उत्तर तत्कालीन अर्थमंत्री म्हणून जयंत पाटील यांनी दिले होते. ती चर्चा तीन दिवस चालली होती. या सर्वंकष चर्चेतून राज्याला उत्तम कायदा मिळाला हे फलित आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
संसदीय आयुधांचा सदुपयोग व्हावा - राजेंद्र दर्डा
लोकशाहीचे मंदिर म्हणून संसद व विधिमंडळाकडे पाहण्यात येते. लोककल्याणासाठी अनेक महत्त्वाचे कायदे येथे करण्यात येतात. मात्र अलीकडच्या काळात सकस वादविवाद न होता वारंवार सभागृह बंद पडणे, गोंधळात चर्चेविना विधेयक मंजूर होणे हे पाहायला मिळते. त्यामुळे विचारवंत व जनतेला अनेक प्रश्न पडतात. नवीन पिढीचा विधिमंडळाबाबत आदर कमी होऊ नये याची जबाबदारी सर्वांची आहे. विधिमंडळात भांडायचे असते, अडवायचे असते व विविध आयुधांचा उपयोग करून विरोधकांनी सत्ताधाºयांना अडचणीत आणायचे असते. शेवटी राज्याच्या हितामध्ये काहीतरी पदरात पाडायचे असते. पण तुटेपर्यंत ताणायचे नसते. देशातील इतर विधिमंडळांना आदर्श घालून देण्याचे कार्य महाराष्ट्र विधिमंडळाने केले आहे. विधिमंडळातील सदस्यांमध्ये समाजामध्ये अनेक गैरसमज आहे. तेथे कामकाज होत नाही, वेळ व्यर्थ जातो असे बोलल्या जाते. काही वेळा असे घडते, मात्र रात्री उशिरापर्यंतदेखील अनेकदा कामकाज चालते. संसदीय आयुधांचा सदुपयोग जनतेच्या कल्याणासाठी करणे हे जनतेला अपेक्षित आहे. त्यांच्या अपेक्षांवर आपण खरे उतरत आहोत का यावर चिंतन करण्याची आवश्यकता आहे, असे मत ‘लोकमत’चे ‘एडिटर इन चीफ’ राजेंद्र दर्डा यांनी व्यक्त केले.
हे ठरले पुरस्काराचे मानकरी
उत्कृष्ट अभ्यासू वक्ता : आ. संजय दत्त, काँग्रेस (विधान परिषद), आ. अॅड. आशिष शेलार, भाजपा (विधानसभा)
उत्कृष्ट महिला आमदार :
आ. विद्या चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस (विधान परिषद),
आ. यशोमती ठाकूर, काँग्रेस (विधानसभा)
उत्कृष्ट नवोदित आमदार : आ. अनिल सोले (विधान परिषद), आ. सुनील प्रभू, शिवसेना (विधानसभा)
मुख्यमंत्र्यांकडून लोकमतचे अभिनंदन
विधिमंडळात उत्तम काम करणाऱ्या आमदारांचा गौरव करण्याचा निर्णय लोकमतने घेतला.यामुळे काम करणाºया आमदारांना प्रोत्साहन मिळेल. यासाठी लोकमतचे अभिनंदन. पुरस्कार प्राप्त प्रत्येक आमदारांचे काम लोकाभिमुख आहेच. पण या नव्या जबाबदारीमुळे ते आणखी लोकाभिमुख होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
‘लोकमत की अदालत’ रंगली
या सोहळ्यात आयोजित ‘लोकमत की अदालत’ चांगलीच रंगली. प्रसिद्ध विधिज्ञ अॅड. उज्ज्वल निकम यांनी वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व परिवहन मंत्री दिवाकर रावते, विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्टÑवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर जनतेच्या मनातील प्रश्नांची, आक्षेपांची व आरोपांची सरबत्ती करीत उलटतपासणी घेतली. नेत्यांनीही तेवढ्याच शिताफीने व ताकदीने त्यावर आपली बाजू मांडली. काय होते अॅड. निकम यांचे प्रश्न, त्यावर नेत्यांनी काय दिली उत्तरे, हे उद्याच्या (शनिवार) लोकमतमध्ये नक्की वाचा.
आमदारांना प्रोत्साहन देणारा पुरस्कार - गिरीश बापट
‘लोकमत’च्या पुरस्काराबाबत मनामध्ये नेहमीच उत्सुकता असते. विधिमंडळात कार्य करीत असताना पक्षीय बंधने असतात, लोकांसाठी काम करण्याचा दबाव असतो. चांगले काम व्हावे, वंचितांना न्याय मिळावा या भूमिकेतून लोकप्रतिनिधी विधिमंडळात काम करतो तेव्हा आपल्या भूमिकेशी ठाम राहत असताना आपण कसे काम करतो आहे याचे प्रतिबिंब कुठेतरी बघत असतो. निवडून येणे हा त्यातील एक भाग आहे. विधिमंडळात न्याय मिळवून देण्याचे काम जो मनापासून करतो त्याला पुरस्कार देणे हे प्रोत्साहनच आहे, असे प्रतिपादन संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी केले. ‘लोकमत’ने पुरस्कार विजेते निवडताना घेतलेल्या निष्पक्ष भूमिकेचे त्यांनी कौतुक केले. ‘लोकमत’ ही लोकप्रतिनिधींच्या पाठीमागे उभे राहणारी महाराष्ट्रातील एक चळवळ झाली आहे, असे कौतुकोद्गार त्यांनी काढले.