बालगोविंदांच्या परवानगीसाठी समन्वय समितीची धावाधाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2016 12:59 AM2016-07-26T00:59:57+5:302016-07-26T00:59:57+5:30
१२ वर्षांखालील गोविंदाना दहीहंडी उत्सवात सामील न होण्याचा निर्णय २०१४ साली घेण्यात आला. मात्र त्यानंतर उत्सवावरील वादाचे सावट वाढत गेले. आता पुन्हा या उत्सवाचे वेध
मुंबई : १२ वर्षांखालील गोविंदाना दहीहंडी उत्सवात सामील न होण्याचा निर्णय २०१४ साली घेण्यात आला. मात्र त्यानंतर उत्सवावरील वादाचे सावट वाढत गेले. आता पुन्हा या उत्सवाचे वेध लागल्याने दहीहंडी समन्वय समितीने याविषयीच्या ठोस निर्णयासाठी राजकीय पक्षांकडे धावाधाव सुरु केली आहे.
बालगोविंदांच्या उत्सव सहभागातील बंदीनंतरही काही पथकांनी थरांवरील एक्क्याचे वय लपवित निर्णयाकडे दुर्लक्ष केले. मात्र या निर्णयानंतर पोलीस यंत्रणाही याविषयी अधिक सजग झाल्याने दहीहंडी पथकांना याचा फटकाही सहन करावा लागला. गेल्या वर्षी बऱ्याच ठिकाणी बालगोविंदांच्या सहभागामुळे हंडीच्या सरावांना अटकाव करण्यात आला होता. त्यामुळे आजमितीस, या उत्सवावरील वादाची किनार कायम आहे.
यावरच उपाय शोधण्याकरिता सध्या दहीहंडी समन्वय समिती राजकीय पक्षांच्या पायऱ्या झिजवत आहे. २९ जुलै रोजी उच्च न्यायालयात अवमान याचिकेवर होणाऱ्या सुनावणीपूर्वी बालगोविंदाचा विषय निकालात निघावा, यासाठी समन्वय समितीची धावाधाव सुरु आहे.
एरव्ही दहीहंडींच्या बैठकांसाठी पुढाकार घेणारे भाजपचो मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनीही या निर्णयाविषयी कोणतीच ठोस भूमिका घेतली नसल्याची खंत गोविंदांकडून व्यक्त होते आहे.
तर महाराष्ट्राच्या सण-उत्सवांचे पाठीराखे असणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सत्ताधारी असो वा विरोधक कुणीही का असेना, पण बालगोविंदांचा प्रश्न मिटवा यासाठी समन्वय समितीचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. २९ जुलैला याबाबत नक्की काय होते ते कळणार आहे. (प्रतिनिधी)