कुणाला मंत्री,आमदार बनविण्यासाठी नव्हे तर...; संघ पदाधिकाऱ्यांची भाजपला स्पष्ट सूचना

By योगेश पांडे | Published: August 9, 2024 11:48 PM2024-08-09T23:48:57+5:302024-08-09T23:49:27+5:30

संघाच्या समन्वय बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीदेखील उपस्थिती

Coordination meeting of BJP RSS office bearers in Nagpur, Devendra Fadnavis attended | कुणाला मंत्री,आमदार बनविण्यासाठी नव्हे तर...; संघ पदाधिकाऱ्यांची भाजपला स्पष्ट सूचना

कुणाला मंत्री,आमदार बनविण्यासाठी नव्हे तर...; संघ पदाधिकाऱ्यांची भाजपला स्पष्ट सूचना

नागपूर - आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे नागपुरात समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत लोकसभा निवडणूकीतील कामगिरीच्या मुद्द्यांचा आढावा घेण्यात आला. सोबतच पुढील निवडणुकीचे देश व संघविचार पुढे नेण्याच्या दृष्टीने किती महत्त्व आहे यावर मंथन करण्यात आले. या निवडणूकीत कुणाला मंत्री किंवा आमदार बनविण्यासाठी नव्हे तर विचार जिंकविण्यासाठीच प्रयत्न करण्याची सूचना संघाकडून भाजपला करण्यात आली.

नागपुरातील ब्लाइंड रिलीफ असोसिएशनच्या मुंडले सभागृहात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या समन्वय बैठकीला सहसरकार्यवाह अरुण कुमार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संघाचे विदर्भ प्रांत व क्षेत्राचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत संघ परिवारातील सर्व ३६ संघटनांचे विदर्भातील पदाधिकारी सहभागी झाले होते. अरुण कुमार यांनी या समन्वय बैठकीत दोन सत्रे घेतली व दोन्ही सत्रांत त्यांनी मागील १० वर्षांतील कामगिरीचे भविष्यावर होणाऱ्या परिणामांवर भाष्य केले.

लोकसभा निवडणूकीत जे झाले त्यावर मंथन आवश्यक आहेच. मात्र तो अनुभव लक्षात घेऊन जनतेत निर्माण करण्यात आलेले फेक नॅरेटिव्ह खोडून काढण्यासाठी योजना तयार करणे गरजेचे आहे. विधानसभेची लढाई ही विचारांची लढाई आहे. अगोदर काय झाले याचा अनुभव लक्षात घेऊन येणाऱ्या निवडणुकांमध्ये कार्यकर्ता व जनतेसमोर व्यापक स्वरूपात कसे जाता येईल याचा विचार भारतीय जनता पक्षाने करायला हवा. त्याचप्रमाणे विविध घटकांना सोबत घेऊन समन्वय कसा साधता येईल यावर देखील भर देण्याची आवश्यकता असल्याचे मत अरुण कुमार यांनी व्यक्त केले. संघ परिवारातील सर्व संघटनांची समन्वय बैठक नियमित अंतराने होत असते. निवडणूकीला काही आठवडे राहिले असताना ही बैठक होणार असल्याने याला महत्त्व आले होते.

‘बदला व्होट पॅटर्न’चा बसला फटका : फडणवीस

यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी लोकसभेत अपेक्षित जागा का मिळाल्या नाहीत याबाबत विचार मांडले. अनेक मतदारसंघात विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हमुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. काही समाजाच्या लोकांना तर ‘बदला’ घ्यायचा आहे असे बिंबविण्यात आले व त्या ‘व्होट पॅटर्न’चा मोठा फटका बसला, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. आम्ही सत्तेबाहेर होतो तेव्हा राज्यात अनेक चुकीची धोरणे राबविण्यात आली. संघ परिवारातील काहींना शिवसेना व राष्ट्रवादीचे अजित पवार यांना सोबत घेणे खटकले. मात्र त्यांच्या सोबत सत्तेत आल्याने अनेक सकारात्मक बदल घडवता आले आहेत. पुढील निवडणूक या दोन्ही पक्षांसोबतच लढणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. यावेळी लोकसभा निवडणूकीत महायुती कुठे कमी पडली व विधानसभा निवडणूकीत काय योजना असतील यावरदेखील त्यांनी भाष्य केले.

सुरक्षा ताफ्याशिवाय पोहोचले फडणवीस
फडणवीस हे संघाच्या या बैठकीला खाजगी कारने पोहोचले होते. त्यांच्यासोबत कुठलीही सुरक्षाव्यवस्था नव्हती. केवळ वाहनचालक व स्वीय सहायक यांच्यासोबत फडणवीस बैठकस्थळी पोहोचले. विशेष म्हणजे सुरक्षायंत्रणांना याची माहितीदेखील देण्यात आली नव्हती.

Web Title: Coordination meeting of BJP RSS office bearers in Nagpur, Devendra Fadnavis attended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.