कोरेगाव-भीमाची घटना हे षड्यंत्रच!, मुख्यमंत्र्यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 04:07 AM2018-01-17T04:07:52+5:302018-01-17T04:08:15+5:30
समाजामध्ये दुही निर्माण करून सामाजिक सौहार्दाला सुरुंग लावण्याचे षड्यंत्र कोरेगाव-भीमा येथील हिंसक घटनांच्या मागे होते, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत दिली.
मुंबई : समाजामध्ये दुही निर्माण करून सामाजिक सौहार्दाला सुरुंग लावण्याचे षड्यंत्र कोरेगाव-भीमा येथील हिंसक घटनांच्या मागे होते, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत दिली. खा. रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी कोरेगाव-भीमाप्रकरणी निवेदन केले. ते म्हणाले की, दंगल घडवून राज्य सरकारची प्रतिमा मलिन करण्याचे षड्यंत्र होते. मात्र, सरकारने परिस्थिती व्यवस्थित हाताळल्यामुळे दंगलीचे लोण राज्यभर पसरले नाही. या घटनेत हिंदुत्ववादी संघटनांचा हात असल्याचे सांगून वातावरण पेटविण्याचा प्रयत्न झाला, असा आरोपही मुख्यमंत्र्यांनी अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे नाव न घेता केला.
संविधान बचाव रॅलीला तिरंगा रॅलीने प्रत्युत्तर
काही विरोधी पक्षांकडून प्रजासत्ताक दिनी संविधान बचाव रॅली काढण्यात येणार असून, त्याला प्रत्युत्तर म्हणून त्याच दिवशी भाजपाच्या वतीने ठिकठिकाणी तिरंगा रॅली काढण्यात येतील, असे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी जाहीर केले. यापुढेही अशा जातीय तणाव वाढविणाºया घटना घडू शकतात. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांनी लोकांत मिसळून सलोखा कायम राखण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. या बैठकीत पक्षविस्तार योजनेचा आढावा घेण्यात आला. पदाधिकाºयांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे, असेही सांगण्यात आले.