कोपर्डी प्रकरण; सुप्रीम कोर्टाने आरोपींची याचिका फेटाळली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2017 12:36 PM2017-08-17T12:36:27+5:302017-08-17T12:40:31+5:30
अहमदनगरमधील कोपर्डी बलात्कार प्रकरणाच्या आरोपींची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे.
नवी दिल्ली, दि. 17- अहमदनगरमधील कोपर्डी बलात्कार प्रकरणाच्या आरोपींची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. बचावपक्षाच्या साक्षीदारांची उलटतपासणी करण्याची मागणी आरोपींच्या वकिलांनी केली होती. पण सुप्रीम कोर्टाने ही याचिका तातडीने फेटाळल्याने, पुन्हा हे प्रकरण सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आलं आहे. याप्रकरणी आजच सत्र न्यायालयात पुढील सुनावणी होत आहे.
आणखी वाचा
कोपर्डी प्रकरण : खटल्यात हवी मुख्यमंत्र्यांची साक्ष!
कोपर्डी खटल्यात आणखी साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यासंदर्भात सुनावणी पूर्ण; निकाल राखीव
यापूर्वी आरोपीच्या वकिलांनी अॅडव्होकेट उज्ज्वल निकम, अहमदनगरचे जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही साक्ष घेण्याची परवानगी मिळावी, अशी याचिका केली होती. पण ही याचिका सत्र न्यायालयासह हायकोर्टानेही फेटाळली होती. यानंतर आरोपीच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. पण गुरूवारी सुप्रीम कोर्टानेही आरोपींची ही याचिका तडकाफडकी फेटाळून लावली आहे. या सर्वप्रकारावरुन आरोपीच्या वकिलांकडून वेळ काढूपणा सुरु असल्याचं बोललं जातं आहे.
कोपर्डी घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत व वृत्तवाहिन्यांशी बोलताना आरोपींना फाशी होणार असल्याचे वक्तव्य केलं होतें त्याच अनुषंगाने त्यांचा साक्षीदाराच्या यादीत समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली होती.