ग्रंथदिंडीत राज्यघटनेचीही प्रत

By admin | Published: February 4, 2017 01:41 AM2017-02-04T01:41:26+5:302017-02-04T01:41:26+5:30

फुलांनी सजवलेल्या पालखीत ठेवलेली भारतीय राज्यघटनेची प्रत, रुबाबदार भगवे फेटे परिधान केलेले साहित्यिक आणि रसिक, ढोलताशांचा गजर, लेझीमवर शालेय विद्यार्थ्यांनी

A copy of the Constitution of the Book | ग्रंथदिंडीत राज्यघटनेचीही प्रत

ग्रंथदिंडीत राज्यघटनेचीही प्रत

Next

- जान्हवी मोर्ये, पु.भा. भावे साहित्यनगरी (डोंबिवली)

फुलांनी सजवलेल्या पालखीत ठेवलेली भारतीय राज्यघटनेची प्रत, रुबाबदार भगवे फेटे परिधान केलेले साहित्यिक आणि रसिक, ढोलताशांचा गजर, लेझीमवर शालेय विद्यार्थ्यांनी धरलेला ताल, मराठी सारस्वताचे वैभव सांगणारे चित्ररथ, रांगोळ्या-पताका यांनी सजलेले रस्ते व चौक अशा अत्यंत दिमाखदार व अभूतपूर्व उत्साहाच्या वातावरणात नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त शुक्रवारी ग्रंथदिंडी काढण्यात आली. डोंबिवलीचे ग्रामदैवत मानल्या जाणाऱ्या गणेश मंदिरापासून ही ग्रंथदिंडी निघाली. पालखीत ठेवलेली भारतीय राज्यघटनेची प्रत हे या ग्रंथदिंडीचे खास वैशिष्ट्य होते.
गणेश मंंदिरात भाजपा नेते जगन्नाथ पाटील, महापौर राजेंद्र देवळेकर, साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष श्रीपाल सबनीस व महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांच्या हस्ते गणेश व सरस्वतीपूजन करण्यात आले. पालखीचे पहिले औक्षण करण्याचा मान गणपती मंदिराला मिळाला. त्यानंतर, ग्रंथदिंडीला रीतसर सुरुवात झाली.
साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे, मावळते अध्यक्ष श्रीपाल सबनीस, कल्याण-डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी, स्वागताध्यक्ष आणि आयोजक आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाबराव वझे ही मान्यवर मंडळी ग्रंथदिंडीच्या पालखीचे भोई झाले होते. डोंबिवलीच्या विविध भागांतील शाळांचे विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, शहरातील विविध संस्था, वारकरी व महानुभाव पंथाचे अनुयायी, विविध भाषिक गट यांच्यासह सामाजिक संस्था या दिंडीत सहभागी झाल्या होत्या. दिंडीच्या सुरुवातीला साहित्य संमेलनाचा चित्ररथ होता. त्यात एका बाजूला राज्यघटनेची उद्देशिका, दुसऱ्या बाजूला पसायदान, शिवाय ज्ञानेश्वर-तुकाराम यांच्यासह विविध संतांच्या प्रतिमांनी चित्ररथ सजवला होता. ‘डोंबिवलीकर’ मासिकाच्या चित्ररथासह १४ चित्ररथ, १८ लेझीम पथकेही, १६ पालख्या, ५७ शैक्षणिक संस्था, ४० सामाजिक व सांस्कृतिक संस्था, स्काउट गाइड व एनसीसीचे ५०० विद्यार्थी, १७५ शिक्षक, ९५०० शालेय विद्यार्थी असे सुमारे १५ हजार जण ग्रंथदिंडीत सहभागी झाले होते. ठाकुर्लीतील बंगाली व तामीळ भाषिक शाळाही सहभागी झाल्या होत्या.
पोसू बाळ पाटील शाळेने ‘मुलगी वाचवा’चा संदेश दिला होता. वझे माध्यमिक विद्यालयाने वारकरी संप्रदायाची तर सरलाबाई म्हात्रे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा सादर करून लेझीम नृत्य केले. स्वामी विवेकानंद शाळेने ग.दि. माडगूळकर, कुसुमाग्रज यांची छायाचित्रे असलेले फलक व त्यांच्या साहित्यातील वेचक उतारे उद्धृत केले. ओंकार शाळेच्या विद्यार्थ्यांनी सैनिकांची वेशभूषा केली तर शिवाई विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषेतून शिक्षण घेऊन मोठ्या झालेल्या व्यक्तींचा पट मांडला होता. इंग्रजी भाषेचे स्तोम वाढले, ते वाढू देऊ नका, असा संदेश त्यांनी दिला. ज्ञानमंदिर विद्यासंकुलाने भारतमातेला अंधश्रद्धा, भ्रष्टाचार, आतंकवाद या साखळदंडांनी जखडल्याचे चित्र उभे केले होते. पुण्याहून आलेले सागर रोकडे यांनी संत गाडगे महाराजांची वेशभूषा करून ग्रंथदिंडीत स्वच्छतेचा संदेश दिला.

साहित्य संमेलन ध्वजारोहण
साहित्य संमेलनानिमित्त काढण्यात आलेली ग्रंथदिंडी संमेलनाच्या पु.भा. भावेनगरीत पोहोचल्यावर साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांच्या हस्ते साहित्य ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी महापौर राजेंद्र देवळेकर, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, संमेलनाचे मावळते अध्यक्ष श्रीपाल सबनीस, संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे, स्वागताध्यक्ष गुलाब वझे आदी मान्यवर उपस्थित होते.
श्रीपाद जोशी म्हणाले, साहित्य संमेलन हे महामंडळ आणि घटक संस्थांकडून आयोजित केले जाते. आयोजनात केडीएमसीने प्रथमच पुढाकार घेतला आहे. साहित्याचा उत्सव साजरा करायला सर्व पदाधिकारी सक्रिय आहेत. राजकारण करणारी मंडळी साहित्याशी नाते जोडणारी असतील, तर त्यांच्या सहकार्याशिवाय साहित्य संमेलन साकार होऊ शकत नाही. या उत्सवाच्या निमित्ताने डोंबिवलीची नवी ओळख निर्माण झाली आहे. यातूनच सांस्कृतिक अभिसरण होते.

‘संमेलनाध्यक्षांच्या आत्मकथे’चे प्रकाशन
संमेलननगरीत स्थापन केलेल्या प्रकाशन मंचच्या प्रा. धनश्री साने या प्रमुख आहेत. संमेलनाच्या तीन दिवसांत येथे १६० पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित केली जाणार आहे. सबनीस यांच्या ‘संमेलनाध्यक्षांची आत्मकथा’ आणि ‘संमेलन अध्यक्षांच्या भाषणाची मीमांसा’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
या वेळी डॉ. अक्षयकुमार काळे यांनी सांगितले की, मी अनेक पुस्तकांच्या प्रकाशन समारंभास जाण्यापूर्वी त्या पुस्तकांंचे वाचन करून गेलो. माजी संमेलनाध्यक्षांच्या आत्मकथेचे मी अद्याप वाचन केलेले नाही. त्यांची कारकीर्द ही वादळी ठरली असल्याने त्यांचे आत्मकथनही वादळीच असणार, असे मला वाटते. ते नक्कीच वाचणार, अशी ग्वाही दिली.
महामंडळाचे अध्यक्ष डॉ. जोशी म्हणाले की, हे संमेलन अनेक विक्रम नोंदवत आहे. संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी ‘संमेलनाध्यक्षांची डायरी’ लिहिली, तर सबनीस यांनी ‘संमेलनाध्यांची आत्मकथा’ लिहिली. तसेच त्यांच्या भाषणाची मीमांसा विवेक कांबळे या अभ्यासू पत्रकाराने केली. यावरून, संमेलनाचे अध्यक्ष नवा पायंडा पाडत आहे.
सबनीस यांचे नाव अध्यक्षपदासाठी पुढे आले, तेव्हा ‘कोण हे सबनीस’ तसेच ‘कोण हे काळे’, असा सवाल काही संकुचित पत्रकारांनी केला. सबनीस यांनी ते कोण आहेत, हे त्यांनी त्यांच्या वक्तव्यातून दाखवून दिले. तोच शिरस्ता काळे पुढे चालू ठेवतील.
पत्रकारिता करंटी झाली असल्याची टीकाजोशी यांनी केली. पुणे-मुंबईच्या पलीकडे मराठवाडा, विदर्भ आणि कोकणातील साहित्यिक काय आहेत, हे मराठी पत्रकारांना माहीत नसेल, तर त्यांनी ते जाणून घ्यावे. तेच दाखवून देण्याचे उत्तम काम सबनीस यांनी केले आहे.

राज ठाकरे यांची संमेलनाकडे पाठ
ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते होणार होते. मात्र, महापालिकांच्या निवडणुकीत मनसेमध्ये झालेली बंडखोरी व तिकीटवाटपाचे वाद या कामात व्यस्त असल्याने त्यांना उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे सबनीस यांच्या हस्ते ग्रंथदालनाचे उद्घाटन करण्यात आले.

आमच्यावर
कानडी भाषेची सक्ती नको...
बेळगाव, निपाणी आणि कारवार हे तीन प्रांत महाराष्ट्रात सहभागी करून घ्या, या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे एल.आय. पाटील यांनी संमेलननगरीत घोषणाबाजी केली. त्यांच्यावर कानडी भाषेची सक्ती केली जात आहे. ती करण्यात येऊ नये.
मराठी बोलीभाषा असल्याने कन्नड सरकार मराठीवर अत्याचार करीत आहे. कन्नड सरकार अन्यायी आणि जुलुमी आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा असून त्यांनी हिंदी भाषा शालेय अभ्यासातून काढली आहे. दरवर्षी आम्ही आम्हाला महाराष्ट्रात सामावून घ्या, असा ठराव करतो.
त्या ठरावाची अंमलबजावणी केली जात नाही. ६१ वर्षांपासून आम्ही मागणी करतो आहेत. त्याची पूर्तता होत नाही. संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत असल्याने त्यांनी आमच्या मागणीचा व आमच्यावर होत असलेल्या कानडी भाषासक्तीचा बीमोड करणारा निर्णय घ्यावा, असे पाटील यांनी स्पष्ट केले. त्यांच्या घोषणाबाजीमुळे काही काळ गोंधळ उडाला.

आजी-माजी अध्यक्षांनी घातली फुगडी
ग्रंथदिंडीत साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस व नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी फुगडी घातली. त्यामुळे या दोन्ही अध्यक्षांच्या समीक्षेचे व साहित्याचे अंतरंग किती मिळतेजुळते आहे, त्यांच्या फुगडीची पकड किती घट्ट आहे, याचेच प्रत्यक्ष दर्शन ग्रंथदिंडीत सहभागी झालेल्यांना पाहावयास मिळाले.

ग्रंथदिंडीचा चुकला मार्ग : गणेश मंदिर संस्थानपासून ग्रंथदिंडीला सुरुवात झाली. ग्रंथदिंडी सरळ चाररस्तामार्गे साहित्यनगरी पु.भा. भावे येथे येणार होती. मात्र, ती टिळकनगर शाळेच्या गल्लीतून वळल्याने ग्रंथदिंडी संमेलनस्थळाकडे येण्यास उशीर झाला. लहान शालेय विद्यार्थ्यांना तीन किलोमीटरची पायपीट करावी लागल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांकडून त्रागा करण्यात आला.

- दिंडीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांकडून १० रुपयांचे शुल्क घेणार नाही, असे ग्रंथदिंडीचे प्रमुख अच्युत कऱ्हाडकर यांच्याकडून कळवण्यात आल्याचे एका शिक्षकाने स्पष्ट केले. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर एकच गदारोळ उठला होता.

Web Title: A copy of the Constitution of the Book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.