कोरे विधान परिषदेसाठी ‘इच्छुक’ नाहीत
By Admin | Published: November 6, 2015 12:35 AM2015-11-06T00:35:19+5:302015-11-06T00:35:33+5:30
विधानसभा हेच ‘टार्गेट’ : विजय जाधव यांचे स्पष्टीकरण
कोल्हापूर : जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते व माजी आमदार विनय कोरे (सावकर) हे विधान परिषदेची निवडणूक लढविण्यास इच्छुक नाहीत. पन्हाळा-शाहूवाडी विधानसभा मतदारसंघातील आगामी निवडणूक हेच आमचे टार्गेट असल्याचे या पक्षाचे प्रवक्ते विजयसिंह जाधव यांनी स्पष्ट केले. त्यामुळे कोरे ही निवडणूक लढविण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
बुधवारी सकाळी आमदार महादेवराव महाडिक यांनी स्वत: वारणा कारखान्यावर जाऊन कोरे यांची बंद खोलीत भेट घेतली. ही भेट फक्त दहाच मिनिटे झाली; परंतु त्याबद्दल राजकारणात उलटसुलट चर्चा सुरूझाल्या. त्यामुळे ‘लोकमत’ने जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रवक्ते जाधव यांच्याशी संपर्क साधला व कोरे यांची नक्की भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी जाधव म्हणाले, ‘विधान परिषदेसाठी एकूण ३५० मतदान आहे. त्यामुळे ही निवडणूक जिंकायची असेल, तर (पान १ वरून) किमान १८० मते लागतील. जनसुराज्यकडे आता ३० ते ३५ मते आहेत. त्यामुळे दुसऱ्याच्या बळावर ही निवडणूक लढविण्याची आमची इच्छा नाही. त्यामुळे स्वत: सावकर हेच ही निवडणूक लढविण्यास इच्छुक नाहीत. त्यासंबंधी सुरू असलेली चर्चा अनाठायी आहे. आमच्या दृष्टीने विधानसभा निवडणूक हेच आमचे मुख्य टार्गेट आहे.’आता जिल्ह्याच्या राजकारणात कोरे यांची माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याशी मैत्री आहे. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ आणि बाजार समितीच्या निवडणुकीतही हे दोन नेते एकत्र होते. शिवाय कोरे यांचे महाडिक यांच्याशी पारंपरिक राजकीय वैर आहे.महाडिक सावकरांना वारणेवर भेटायला येतात, हे देखील कोरे गटाच्या कार्यकर्त्यांना आवडत नाही; परंतु तरीही ते लोकसभा निवडणुकीवेळीही कोरे यांना भेटायला गेले होते. नंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सुनेच्या विजयासाठी ते गेले होते व आता स्वत:च्या मदतीसाठी ते वारणेची पायरी चढले. नेहमी घड्याळाच्या काट्याकडे लक्ष ठेवून असलेल्या महाडिक यांना सावकर यांची भेट घेण्यासाठी मात्र
तब्बल तासभर प्रतीक्षा करावी लागली.
भेटीमागील ‘कारण’
जनसुराज्य शक्ती पक्षाचा पाठिंबा मिळावा यासाठी महाडिक यांनी ही भेट घेतली असल्याचे समजते. महाडिक गेले तीन-चार दिवस भेटायला येतो, असे म्हणत होते. यावर दोन दिवसांनी भेटू, असे कोरे यांनी त्यांना सांगितले होते. त्यानुसार ही भेट झाली. महाडिक हे काँग्रेसचे आमदार असले तरी त्यांना आता पक्षाची उमेदवारी मिळण्याची शक्यता धुसर बनली आहे. त्यामुळे काँग्रेस सोडून इतर मतांसाठी महाडिक यांची जोडणी सुरू झाली आहे. त्याचाच भाग म्हणून त्यांनी ही भेट घेतल्याचे समजते.