महागाईचा तडाखा! डिझेलपाठोपाठ कोथिंबीरही १०० रुपयांवर; हिरवी मिरचीही २०० रुपये किलो
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 06:49 AM2021-10-20T06:49:57+5:302021-10-20T06:51:09+5:30
वाहतूक खर्च वाढला, भाजीपाल्याचे दर गगनाला
मुंबई : पावसामुळे भाजीपाला खराब झाल्याने बाजारपेठेत आवक कमी आणि वाढता वाहतूक खर्च यामुळे दामदुप्पट दराने भाजीपाला खरेदी करण्याची वेळ नागरिकांवर आलेली आहे. मिरचीचे भाव कडाडून २०० रुपये किलो झाले असून कोथिंबिरीची जुडी ८० ते १०० रुपयांना मिळते आहे. त्याचा बजेटवर परिणाम झाला आहे.
अनेक जिल्ह्यांतील ग्रामीण भागातून उत्पादित भाजीपाला कमी येत आहे. त्यातच डिझेलच्या दरवाढीमुळे वाहतुकीचा खर्च पाहता भाजीपाला ५० ते १२० रुपये प्रतिकिलोने नागरिकांना खरेदी करावा लागत आहे. गणेशोत्सव, गौरीपूजन, पितृपक्ष आणि नवरात्र उत्सव, दसरा या सणावारात मांसाहार बंद होता. त्यामुळे भाज्यांची विक्री वाढत त्या फार महागल्या आहेत. आधी ५ ते १० रुपये पाव किलो असलेली भाजी आता २० ते २५ रुपयांना खरेदी करावी लागत
आहे. त्यामुळे अनेक ग्राहक महागलेले दर ऐकून दुकानातून काहीच न घेता माघारी जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
डिझेलचे दर वाढल्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढला. त्यामुळे भाज्या महागल्या आहेत. पाऊसही कमी-जास्त प्रमाणात असून, उत्पादन कमी आहे. त्यामुळे भाव वाढले आहेत
- अशोक सकट, भाजीपाला विक्रेते
किरकोळ बाजारातील किंमत
पालक : ५० रुपये जुडी
मेथी : ५० ते ६० रुपये
भेंडी : ६० ते ७० रुपये
सिमला मिरची : ८० रुपये
फूल कोबी : ८० रुपये
वांगी : ९० रुपये
गवार : १२० रुपये
टोमॅटो : ८० ते १०० रुपये
कांदा : ५० ते ६० रुपये
बटाटा : ४० ते ६० रुपये