CoronaVirus Lockdown: घराबाहेर पडू न शकणाऱ्यांना ‘ही’ माणसं, सेवा देताहेत आधार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 01:04 PM2020-04-09T13:04:05+5:302020-04-09T13:10:30+5:30

लॉकडाऊनमुळे घरात बंदिस्त झालेल्या नागरिकांचं आयुष्य सुकर करण्यासाठी काही व्यक्ती, कंपन्या प्रयत्न करत आहेत.

cornavirus lockdown some essential services are making lockdown little easier for you | CoronaVirus Lockdown: घराबाहेर पडू न शकणाऱ्यांना ‘ही’ माणसं, सेवा देताहेत आधार

CoronaVirus Lockdown: घराबाहेर पडू न शकणाऱ्यांना ‘ही’ माणसं, सेवा देताहेत आधार

Next
ठळक मुद्देकेंद्र सरकारने २५ मार्च ते १४ एप्रिल अशा २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केलीय. किराणा सामान पुरवणारे दुकानदारही अत्यंत शिस्तबद्ध रीतीने सेवा देताना दिसत आहेत.एअरटेलच्या अ‍ॅपद्वारे तुम्ही तुमच्या स्मार्टफोनसह इतरांच्या मोबाईलचेही रिचार्ज करू शकता.

मुंबईः कोरोना विषाणूविरुद्धचं युद्ध जिंकण्यासाठी संपूर्ण देश एकजूट झाला आहे. प्रत्येक जण यथाशक्ती आपलं योगदान देतोय. केंद्र सरकारने २५ मार्च ते १४ एप्रिल अशा २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केलीय. त्यामुळे आबालवृद्ध घरातच आहेत. घड्याळाच्या काट्यावर धावणारी मुंबईच एकदम शांत, स्तब्ध झालीय, तर इतर शहरं-गावांमधला सन्नाटा काय सांगावा. घराबाहेर न पडणं आणि कोरोनाला पसरण्याची संधी न देणं, हे प्रत्येकाचं कर्तव्यच आहे आणि कोट्यवधी नागरिक ते अगदी इमाने-इतबारे पार पाडत आहेत. या लॉकडाऊनमुळे कुटुंब जवळ आलंय, एकमेकांना वेळ देण्याची संधी मिळालीय, ‘वर्क फ्रॉम होम’मुळे दगदग कमी झालीय हे खरं आहेच; पण काही मूलभूत प्रश्नही निर्माण झाले आहेत. जीवनावश्यक वस्तू कशा मिळवायच्या, काही आजारांसाठी डॉक्टरांचा सल्ला कसा घ्यायचा, परीक्षा आणि अभ्यासाचं काय, घरात बसून येणारा कंटाळा कसा टाळायचा, हे त्यापैकी काही. पण, संकटसमयी मदत करण्याच्या आपल्या संस्कृती आणि संस्कारामुळे यातील बरेच प्रश्न सुटलेत... सुटताहेत. लॉकडाऊनमुळे घरात बंदिस्त झालेल्या नागरिकांचं आयुष्य सुकर करण्यासाठी काही व्यक्ती, कंपन्या प्रयत्न करत आहेत.

अन्नदाता सुखी  भव!

कोरोनाच्या संकटाला न डगमगता शेतकरी आपल्या शेतांमध्ये राबत आहेत. शेतमालाची वाहतूक करणारे लोक या अन्नदात्यानं पिकवलेलं अन्न आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. हा भाजीपाला आणि फळं बाजारांमध्ये घेऊन येणारे छोटे विक्रेतेही मोठी भूमिका बजावत आहेत. कारण, फ्रोजन वस्तू किंवा मॅगीसारख्या इन्स्टंट पदार्थांचा आपण साठा करून ठेवू शकतो. परंतु, भाज्यांचं, दुधाचं तसं नाही. ते ताजंच हवं. म्हणूनच, या वस्तू घरापर्यंत किंवा घराजवळ घेऊन येणाऱ्यांचे आभारच मानायला हवेत. किराणा सामान पुरवणारे दुकानदारही अत्यंत शिस्तबद्ध रीतीने सेवा देताना दिसत आहेत.  बिग बजार, डी मार्ट ही मोठी सुपरमार्केट आणि स्थानिक पातळीवरची सुपरमार्केट ग्राहकांसाठी तत्पर आहेत. काही जण गरजूंना, ज्येष्ठ नागरिकांना होम डिलिव्हरी देण्याचाही प्रयत्न करत आहेत.

थँक यू डॉक्टर!

कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि नर्सेसना सॅल्यूट करायला हवाच. पण, शहरं आणि गावांमध्ये छोटे दवाखाने आणि हॉस्पिटल्समध्ये रुग्णसेवा करणारे डॉक्टरही कौतुकास पात्र आहेत. वातावरण बदलल्याने, कडक उन्हाळा सुरू झाल्याने काही आजार डोकं वर काढू लागले आहेत. बीपी, डायबिटीस असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनाही वैद्यकीय सल्ल्याची गरज भासते. त्यांना त्या-त्या ठिकाणचे डॉक्टर सेवा देत आहेत. पुण्यातील संजीवनी हॉस्पिटलचे एक डॉक्टर फ्री ऑनलाइन चेक-अप करून ई-प्रीस्क्रिप्शन देत आहेत. अनेक जण फोनवरूनही औषधं सुचवून आधार देत आहेत. डॉक्टरांनी दिलेली औषधं बाहेर जाऊन आणणं शक्य नसल्यास Medlife आणि PharmEasy यासारखी पोर्टल्स अनेक भागात औषधं घरपोच देत आहेत. सॅनिटायझर, मास्क आणि अन्य आरोग्याची काळजी घेणाऱ्या अन्य वस्तूही त्यांच्या माध्यमातून आपण घरबसल्या मिळवू शकतो.

घरबसल्या रिचार्ज

 

लॉकडाऊन काळात जगाशी संपर्क ठेवण्याच्या दृष्टीने मोबाईल हे एक अत्यंत महत्त्वाचं माध्यम झालंय. परंतु, मोबाईलचा डेटा पॅक रिचार्ज कसा करावा, असा प्रश्न बऱ्याच युजर्सना पडू शकतो. कारण, दुकानात जाऊन फोन रिचार्ज करणाऱ्यांची संख्या आजही खूप मोठी आहे. अनेकांकडे स्मार्टफोन आहेत पण रिचार्ज, नेट पॅक संपत आलाय किंवा संपलाय अशी स्थिती आहे. हे ओळखूनच एअरटेलनं Airtel Thanks app लाँच केलं आहे. या अ‍ॅपद्वारे तुम्ही तुमच्या स्मार्टफोनसह इतरांच्या मोबाईलचेही रिचार्ज करू शकता. आपल्या मोबाईलचं बिलही भरू शकता. या अ‍ॅपमध्ये सर्वात सुरक्षित असे युपीआय वापरण्यात आले आहे. त्यामुळे कुठलीही आर्थिक गडबड होण्याची भीती नाही. तसेच या अ‍ॅपद्वारे तुम्ही तुमच्या डीटीएचचेही रिचार्ज करू शकता.

झूमची धूम

लॉकडाऊनमुळे अनेक शाळांमध्ये परीक्षा होऊ शकल्या नाहीत. काही ठिकाणी अभ्यासक्रमही राहिला. परंतु, त्यावरही काही शाळांनी तोडगा शोधून काढला. झूम व्हिडीओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅपद्वारे काही शाळांनी विद्यादानाचं काम सुरू ठेवलं आहे. अनेक क्लासेसही अशा अ‍ॅपचा, गुगल हँगआउटचा वापर करून नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांचा, तसंच काही मोठ्या परीक्षांचा अभ्यास घेत आहेत. काही शाळांनी अ‍ॅपवरूनच प्रश्नपत्रिका पाठवून परीक्षाही घेतल्यात.

रामायण ते वेब सीरिज  व्हाया सिनेमा

घरी बसलेल्या आबालवृद्धांचं मनोरंजन करण्यासाठी दूरदर्शनवर रामायण, महाभारत सुरू झालंय आणि त्याला उदंड प्रतिसादही मिळतोय. अनेक वाहिन्या सिनेप्रेमींना सुपरहिट चित्रपटांची मेजवानी देत आहेत. फक्त शनिवार, रविवारच नाही, तर आठवडाभर भारी-भारी सिनेमे लावले जाताहेत. नेटफ्लिक्स, हॉटस्टार, अ‍ॅमेझॉन प्राईमनंही आपला खजिना उघडलाय. भाडिपावाली मंडळीही नेटकऱ्यांना हसवून टेन्शन विसरायला लावत आहेत. लॉकडाऊनदरम्यान सगळ्यांनी घरी बसावं हाच यामागचा उद्देश आहे आणि कोरोना संकटावर मात करण्यासाठी तोच सर्वोत्तम पर्याय आहे.

Web Title: cornavirus lockdown some essential services are making lockdown little easier for you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.