सावधान, राज्यात पुन्हा कोरोनाचा अलर्ट; आरोग्य सचिवांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 08:57 AM2022-03-22T08:57:27+5:302022-03-22T08:57:55+5:30
आशिया आणि युरोप खंडात संसर्गाची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्यांना आदेश दिले आहेत.
मुंबई : राज्यात कोरोनाची तिसरी लाट नुकतीच ओसरत असल्याने, आता कुठे दिलासा मिळाला आहे. मात्र, काही देशांत आता कोरोनाच्या चौथ्या लाटेला सुरुवात झाली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून तापसदृश्य आजार आणि तीव्र श्वसन विकारांच्या आजारांवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी सर्व जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत.
आशिया आणि युरोप खंडात संसर्गाची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्यांना आदेश दिले आहेत. तापसदृश्य आजारांची आणि तीव्र श्वसन अडथळ्याचा संसर्ग चाचणी हे सरकारसाठी कोरोना नियंत्रणाचे मुख्य स्तंभ आहेत. आता सजगता वाढवून ताप आणि श्वसनविकाराच्या रुग्णांची कोरोना चाचणी करून, त्यातील पॉझिटिव्ह अहवाल जनुकीय संरचनेच्या तपासणीसाठी पाठवावेत, असे या आदेशात म्हटले आहे.
बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांची पालिकेकडून माहिती घेतली जात आहे, तसेच कोरोनाची लक्षणे असल्यास त्याची माहिती गोळा केली जाते. लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांवर वेळीच उपचार करून कोरोना रोखण्याचे नियोजन महापालिकेकडून केले जात आहे.
- सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त.
पुन्हा आढावा बैठका
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने बाधित संख्येत उच्चांक गाठला. मात्र, लसीकरणामुळे रुग्णालयात दाखल करण्याची किंवा मृत्यूची संख्या खूप कमी झाली. आता कोरोनाची तिसरी लाट ओसरली असून, दैनंदिन बाधित संख्या दोन आकडी झाली आहे, तर निर्बंध शिथिल झाले आहेत, तर अखेरची बैठक फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात झाली. एक महिना उसंत नाही मिळत, तोच आशिया आणि युरोप खंडातील चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा बैठका सुरू झाल्या आहेत.