Coronavirus: औरंगाबाद महापालिका निवडणूक पुढे ढकला; महापौरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 04:22 PM2020-03-11T16:22:51+5:302020-03-11T16:31:43+5:30
महापौर घोडेले यांनी ही माहिती मुख्यमंत्र्यांसह निवडणूक आयोगाकडे देखील केली आहे. निवडणुकीच्या प्रचार काळात गर्दी होण्याचा संभव असतो. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होऊ शकतो. औरंगाबाद महानगर पालिकेत शिवसेनेची सत्ता आहे.
औरंगाबाद - जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसने आता महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक ठिकाणच्या यात्रा आणि सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यातच आता औरंगाबाद महानगर पालिकेची निवडणूक पुढे ढकण्याची मागणी करण्यात आली आहे. खुद्द महापौरांनीच ही मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. येत्या एप्रिल महिन्यात औरंगाबाद महापालिकेची मुदत संपणार आहे.
कोरोना व्हायरसची भीती पाहता महापालिका निवडणूक सहा महिने पुढे ढकला अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच निवडणूक पुढे ढकलताना पालिकेवर प्रशासक नेमू नये. विद्यमान नगरसेवकांनाच सहा महिन्यांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी महापौर नंदकुमार घोडले यांनी केली आहे.
महाराष्ट्रात नाशिक आणि पुणे येथे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे राज्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर नांदेड, नागपूर येथे देखील कोरोनाचे संशयीत रुग्ण आढळून आल्याचे समजते. औरंगाबाद येथे ऐतिहासिक लेण्या आहेत. त्यामुळे जगभरातून पर्यंटक औरंगाबाद शहरात येत असतात. त्यामुळे कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता व्यक्त कऱण्यात येत आहे. तसेच कोरोनाचे सावट असताना निवडणूक घेणे संयुक्तीक होणार नाही, असं मत महापौरांचे आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये होणारी निवडणूक सहा महिने पुढे ढकलावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
महापौर घोडेले यांनी ही माहिती मुख्यमंत्र्यांसह निवडणूक आयोगाकडे देखील केली आहे. निवडणुकीच्या प्रचार काळात गर्दी होण्याचा संभव असतो. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होऊ शकतो. औरंगाबाद महानगर पालिकेत शिवसेनेची सत्ता आहे.