Eknath Shinde : "कोरोना बूस्टर डोस मोफत देण्याच्या देशव्यापी मोहिमेची महाराष्ट्रात संपूर्ण अंमलबजावणी करणार"
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 01:51 PM2022-07-14T13:51:26+5:302022-07-14T13:59:51+5:30
Corona Booster Dose : देशव्यापी मोहिमेसंदर्भात आपली पंतप्रधानांशी काल चर्चा झाली आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीच्यावेळी दिली.
मुंबई - शुक्रवारपासून पुढील ७५ दिवस देशातील सर्व प्रौढ व्यक्तींना कोविडचा बूस्टर डोस(वर्धक मात्रा) मोफत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून या मोहिमेची पुरेपूर अंमलबजावणी महाराष्ट्रात केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली. या देशव्यापी मोहिमेसंदर्भात आपली पंतप्रधानांशी काल चर्चा झाली आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीच्यावेळी दिली.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी आरोग्य विभागास निर्देश दिले की, या मोहिमेमध्ये एकही दिवस वाया घालू न देता सर्व संबंधितांना बूस्टर मात्रा मिळालीच पाहिजे यासाठी राज्यातील सर्व लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, आरोग्य संस्था यांना देखील सहभागी करून घ्यावे. याविषयी पुरेशी जन जागृती करावी असेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
राज्यात सत्तेवर आलेल्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारने जनतेला मोठी भेट दिली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात पेट्रोलवरील करात ५ रुपये आणि डिझेलवरील करामध्ये ३ रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता राज्यातील पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे ५ आणि ३ रुपयंनी कमी होणार आहेत.
याबाबत घोषणा करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, पेट्रोल डिझेलचे दर हे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीवर अवलंबून आहेत. केंद्राने ४ नोव्हेंबर २०२१ आणि २२ मे २०२२ रोजी केंद्राने करात कपात केली होती. त्यानंतर राज्यांनाही आवाहन केलं होतं. काही राज्यांनी कर कमी केले होते. मात्र महाराष्ट्रात ते कर कमी झाले नव्हते. आज आम्ही पेट्रोलवरील करात ५ रुपये आणि डिझेलवरील करात ३ रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यात पेट्रोल ५ आणि डिझेल ३ रुपयांनी स्वस्त होणार आहे.