Corona Vaccination: मोठी बातमी! राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील लोकांच्या लसीकरणाला ब्रेक?; राजेश टोपेंचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 02:16 PM2021-05-11T14:16:54+5:302021-05-11T14:25:17+5:30
Vaccine shortage of for 18-44: त्याचसोबत १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला ब्रेक लावावा का याबाबत बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा केली जाईल.
मुंबई – राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरणावर भर दिला जात आहे. दिवसाला २ लाखापर्यंत चाचणी केली जात आहे. चाचणीत कुठेही कमी झालेले नाही. आतापर्यंत १ कोटी ८४ लाख लोकांचं लसीकरण झालं आहे. आता ४५ वयोगटापेक्षा अधिकसाठी केवळ ३५ हजार लसीचे डोस शिल्लक आहेत. त्यामुळे राज्य सरकारकडून १८ ते ४४ वयोगटासाठी खरेदी केलेले ३ लाख ४५ वर्षावरील व्यक्तींना देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी दिली आहे.
राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. टोपे म्हणाले की, राज्यातील ४५ वर्षावरील व्यक्तींना लसीचा दुसरा डोस देणं महत्त्वाचं आहे. सध्या ५ लाख लोकांना लसीचा दुसरा डोस द्यायचा आहे. केंद्राकडून लसीचा साठा उपलब्ध होत नसल्याने अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद पडली आहेत. केंद्र सरकारकडून कोविशिल्डचे १६ लाख डोस येणे बाकी आहे. मात्र लस उपलब्थ होत नसल्याने राज्य सरकारने खरेदी केलेले ३ लाख डोस आता ४५ वर्षावरील व्यक्तींना दिले जाणार आहेत. त्यामुळे राज्यात १८ ते ४४ वयोगटातील लोकांचं लसीकरण थांबण्याचे संकेत राजेश टोपेंनी दिले आहे.
त्याचसोबत १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला ब्रेक लावावा का याबाबत बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा केली जाईल. स्पुतनिक लसीबाबत विचारणा केली असून अद्याप प्रतिसाद आला नसल्याचंही त्यांनी सांगितले. सध्या ज्यांना लसीचा पहिला डोस दिला आहे. त्यांना दुसरा डोस वेळेत देण्याची गरज आहे अन्यथा पहिला डोस वाया जाऊ शकतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत चर्चा केली आहे. उद्याच्या बैठकीत निर्णय होईल अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली.
म्युकरमायकोसिसवर मोफत उपचार
कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजन दिला जातो. तेव्हा त्या ऑक्सिजनमधील पाणी शुध्द असले पाहिजे. पाणी शुद्ध नसल्यास हा बुरशीजन्य आजार म्हणजेच म्युकरमायकोसिसची लागण होते. या आजाराची लक्षणे ही नाक, ओठाजवळ काळे डाग पडतात. हे डाग दिसल्यास तात्काळ उपचार सुरु केले पाहिजेत. हा आजार मेंदू तसेच डोळ्यांना इजा पोहचवू शकतो. या आजारावरील औषधी म्हणजेच एमपी- एंपोथेरिसीन सर्वत्र उपलब्ध आहेत. मागणी वाढल्यामुळे या औषधाच्या किंमती अडीच हजार रूपयांवरून थेट सहा हजार रूपयांवर पोहचल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना ते परवडणारे नाही. ही बाब लक्षात घेऊन लवकरच हे १४ डोस लागणाऱ्या इंजेक्शनचा समावेश महात्मा फुले जन आरोग्य योजनेत केला जाणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.
रूग्णालयांच्या बिलांची तपासणीसाठी कर्मचारी नेमणार
अनेक खासगी रूग्णालय हे रूग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांकडून अधिकचे शुल्क आणि बिल आकारत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे आता दरररोज सकाळी दहा ते सायंकाळी सहा यावेळेत सरकारी कर्मचारी कोविड सेंटरवर तैनात करण्यात येणार आहे. त्यांनी बिलावर स्वाक्षरी केल्यावरच ते बिल रूग्णालयात भरावे लागणार आहे. जालन्या प्रमाणेच अन्य जिल्हाधिकाऱ्यांनी देखील याची नोंद घेऊन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश राजेश टोपे यांनी दिले आहेत.