50 कोटी वृक्षलागवडीला कोरोनामुळे लागला ब्रेक; दुसऱ्या वर्षीही स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 09:12 AM2021-06-05T09:12:49+5:302021-06-05T09:13:06+5:30

साडेतीन लाख झाडे लावणार

Corona breaks 50 crore tree plantations; Postponed for another year | 50 कोटी वृक्षलागवडीला कोरोनामुळे लागला ब्रेक; दुसऱ्या वर्षीही स्थगित

50 कोटी वृक्षलागवडीला कोरोनामुळे लागला ब्रेक; दुसऱ्या वर्षीही स्थगित

Next

- अण्णा नवथर

अहमदनगर : कोरोनामुळे राज्य सरकारच्या वृक्षलागवड मोहिमेला ब्रेक लागला आहे. पाऊस मुबलक असूनही वृक्षलागवड झालेली नाही. सरकारकडूनही यंत्रणांना कार्यक्रम दिला गेला नाही. त्यामुळे जिल्हास्तरावरील प्रशासकीय यंत्रणांनीही वृक्षलागवडीचा कार्यक्रम घेतला नसून, सलग दुसऱ्या वर्षीही ही मोहीम ठप्प आहे. दरम्यान, वनविभागाने ३४५ हेक्टर क्षेत्रावर तीन लाख ६० हजार वृक्षलागवड करण्याचे नियोजन केले आहे.

कोरोनाचा सर्वच क्षेत्रांना फटका बसला. शासनाला विविध कार्यक्रम रद्द करावे लागले. महाविकास आघाडी सरकारने पाच वर्षांत ५० कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यासाठी राज्य सरकारने क्रांतिवीर वसंतराव नाईक हरित अभियान ही योजना सुरू केली होती. प्रत्येक वर्षांत दहा कोटी वृक्षलागवड करण्याचा सरकारचा मानस होता. परंतु, कोरोनाच्या संकटामुळे हा कार्यक्रम बारगळला. सरकारकडून दोन वर्षांत याबाबत कोणत्याही सूचना केल्या गेल्या नाही. दरवर्षी सरकारकडून जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती, महसूल, सार्वजनिक बांधकाम, सामाज कल्याण आदी विभागांना वृक्षलागवड करण्याचे उद्दिष्ट दिले जाते. जिल्हास्तरावर यंत्रणांना रोपे देणे, त्याचा हिशोब ठेवणे, रोपे तयार करणे, यंत्रणांमध्ये समन्वय ठेवण्याची जबाबदारी वनविभागावर असते. परंतु, मागीलवर्षी लॉकडाऊन होता. त्यामुळे वृक्षलागवड कार्यक्रम सरकारकडून जाहीर झाला नाही. लॉकडाऊन असल्याने इतर यंत्रणांनीही वृक्षलागवड केली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील विविध रोपवाटिकांमध्ये पाच लाख १८ हजार रोपे शिल्लक राहिली आहेत. ही रोपे आता २ ते ३ फुटापर्यंत वाढली आहेत. ही रोपे यंदा वनक्षेत्रामध्ये लावण्याचे नियोजन वनविभागाने केले आहे.

वनविभागाची मोहीम सुरूच
राज्य सरकारकडून वृक्षलागवड कार्यक्रम जाहीर झाला नसला तरी वनविभागाकडून दरवर्षी लागवड केली जाते. मागील वर्षील लॉकडाऊन असूनही वनविभागाने १५० हेक्टर क्षेत्रात एक लाख ५५ हजार वृक्षांची लागवड केली. यंदा ३४५ हेक्टर क्षेत्रावर तीन लाख ६० हजार वृक्षलागवड करण्याचे वनविभागाने नियोजन केले आहे.

... असा असतो वृक्षलागवड कार्यक्रम
जानेवारी ते ३१ मार्च खड्डे खोदणे
मार्च ते जून रोपवाटिकेत रोपे तयार करणे
१ जुलै ते ३० सप्टेंबर वृक्षलागवड
प्रत्येक कार्यालयाने वृक्षलागवडीसाठी ५ टक्के निधी खर्च करणे बंधनकारक
ऑक्टोबरपासून वृक्षलागवडीचे संवर्धन करणे
दर तीन महिन्यांनी जिवंत वृक्षांचा अहवाल देणे

अशी झाली वृक्षलागवड
सन २०१८-१९    : १ कोटी १८ लाख
सन २०१७-१८   : ५५ लाख
सन- २०१६- १७ : २८ लाख

Web Title: Corona breaks 50 crore tree plantations; Postponed for another year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.