कोरोना आला, मुदत संपली; अखेर धनंजय मुंडेमुळे १९ तरुणांना मिळाली शासन सेवेत नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 02:38 PM2023-11-11T14:38:15+5:302023-11-11T14:38:42+5:30

त्या तरूणांची तब्बल चार वर्षांची प्रतीक्षा आली फळाला

Corona came, deadline expired but Finally 19 youths got appointment in government service due to Dhananjay Munde | कोरोना आला, मुदत संपली; अखेर धनंजय मुंडेमुळे १९ तरुणांना मिळाली शासन सेवेत नियुक्ती

कोरोना आला, मुदत संपली; अखेर धनंजय मुंडेमुळे १९ तरुणांना मिळाली शासन सेवेत नियुक्ती

मुंबई: महाराष्ट्रासह देशभरात गेल्या तीन वर्षांत कोरोनाचे सावट होते. याचा तडाखा अनेकांना वेगवेगळ्या पद्धतीने बसला. पण यात 'त्या' १९ तरुणांनी दोन-तीन वर्षे अभ्यास करून कृषी सेवक पदाची परीक्षा दिली होती. परंतु परीक्षा, निकाल आणि नियुक्ती प्रक्रिया यावर कोरोनाचे सावट पडले. या दरम्यान झालेल्या विलंबामुळे निवडसूची वैधता कालावधी संपल्याचे तांत्रिक निमित्त बनले आणि या मुलांच्या करिअरवर काळे सावट पडले. अशातच कृषिमंत्रीधनंजय मुंडे यांनी या तरुणांच्या करिअरबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून महत्त्वाचा निर्णय घेतला आणि अखेर १९ तरुणांना अखेर शासकीय सेवेत नियुक्ती मिळाली.

राज्य शासनाच्या कृषी विभागाने ३१३ कृषी सेवक पदांच्या भरतीसाठी प्रक्रिया सुरू केली. त्यामध्ये राज्यभरातून सव्वा लाख अर्ज प्राप्त झाले होते. सन २०१९मध्ये परीक्षा घेण्यात आल्या व २०२०मध्ये निकाल जाहीर करण्यात आला. निकालात उत्तीर्ण उमेदवारांनी काही कारणामुळे नियुक्ती स्वीकारली नाही किंवा विशिष्ट प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध झाले नाहीत, तर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी दिली जाते. अशा १९ उमेदवारांना कृषी सेवक पदी नियुक्तीची संधी मिळाली. परंतु याच दरम्यान कोरोनाचे संकट आल्यामुळे जग ठप्प झाले. सन २०२० ते २१ या कालावधीत कोरोना मुळे सदर कृषी सेवक भरती प्रक्रियेतील उमेदवारांना नियुक्ती देण्याचे काम सुद्धा रखडले.

निकालाच्या दिनांकापासून एक वर्षात नियुक्ती देणे बंधनकारक होते. मात्र कोरोना महामारीमुळे नियुक्ती देण्याबाबतच्या प्रस्तावास उशीर झाल्याने निवड सूची वैधता कालावधी संपुष्टात आला. त्यामुळे या १९ तरुणांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात दाद मागितली. त्यावर न्यायाधिकरणाने संबंधित उमेदवारांना गुणवत्तेनुसार नियुक्ती देण्यासंदर्भात शासनाने निर्णय घ्यावा असे आदेश २०२१ च्या अखेरीला दिले. त्यानुसार या १९ तरुणांनी नियुक्तीच्या निर्णयासाठी शासनाचे दार ठोठावले.

कृषी मंत्रीधनंजय मुंडे यांनी १५ जुलै २०२३ रोजी पदभार स्वीकारला. त्यानंतर ताबडतोब या मुलांना न्याय देण्याची प्रक्रिया सुरू केली. अखेर या तरुणांना कृषी सेवक पदावर नियुक्ती देण्यात आली. याबद्दल या तरुणांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले.

Web Title: Corona came, deadline expired but Finally 19 youths got appointment in government service due to Dhananjay Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.