कोरोनामुळे तीन मंत्र्यांची मंत्रालयातील कार्यालये बंद; कर्मचाऱ्यांना लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 03:32 AM2020-09-13T03:32:57+5:302020-09-13T03:33:26+5:30
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मंत्री कार्यालयातील काही अधिकारी आणि कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाली.
मुंबई : अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ऊर्जामंत्री नितीन राऊत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या मंत्रालयातील कार्यालयामधील काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे या तीनही मंत्र्यांची कार्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मंत्री कार्यालयातील काही अधिकारी आणि कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाली. सहा अधिकारी, कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे भुजबळ यांचे कार्यालय आठ दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या कार्यालयातील चार कर्मचारी कोरोनाबाधित आढळले तर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याही कार्यालयातील कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत. संबंधित मंत्र्यांचीही कार्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. राज्यातील डझनभर आमदार अजूनही कोरोनाबाधित आहेत.
मंत्रालयात अभ्यागतांना थर्मामीटर गनने तपासून प्रवेश दिला जातो. मात्र, कोरोनाबाधित नसल्याचे प्रमाणपत्र दाखविणाºयांनाच प्रवेश द्यावा, अशी कर्मचारी, अधिका-यांची मागणी आहे.