यंदा ‘घागर उताणी रे गोविंदा’; दहीहंडीच्या उत्सवावर कोरोनाचे विरजण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 07:07 AM2020-08-12T07:07:26+5:302020-08-12T07:08:02+5:30
गोविंदा-गोपिका करणार रक्तदान
मुंबई : ‘बोल बजरंग बली की जय’च्या गजरात गोकुळाष्टमी- दहीहंडीच्या दिवशी गोविंदा पथक थरांवर थर लावण्यास निघतात. यंदा मात्र कोरोनामुळे यात खंड पडला आहे. परंतु, दहीहंडी पथकांनी समाजभान राखून विविध उपक्रम राबवून हा सण साजरा करण्याचा निर्धार केला आहे.
कृष्णजन्म झाला की लगोलग सकाळपासूनच दहिहंडीच्या उत्साहाला उधाण येते. सकाळी सोसायटीतील, गल्लीतील, नाक्यावरील हंडी फोडून कल्ला झाला की मुंबईतील पथके गिरणगाव, दादर सोडून हळूहळू घाटकोपर-जोगेश्वरीच्या दिशेने निघतात आणि दुपारनंतर ठाण्यात पोहोचून थरांवर थर लावत दहा वाजेपर्यंत धूमशान करतात.
जय जवान मंडळाचा नऊ थरांचा विक्रमही ठाण्यात त्यातूनच घडला. सेलिब्रिटींचे प्रमोशन इव्हेंट, राजकीय नेत्यांचे खास अँकरिंग यामुळे मुंबई-ठाण्यातील वातावरण पूर्णत; गोविंदामय होऊन जाते. यंदा मात्र असे चित्र दिसणार नाही. पुण्यासह राज्यातील अन्य मोठ्या शहरांमध्येही याचा मागमूस दिसत नाही.
दहीहंडी पथकांनी हंड्या बांधल्या खऱ्या, पण सराव केला नाही
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने दहीहंडी पथकांनी सरावाच्या हंड्या बांधल्या खºया पण सराव केला नाही. याच जागेवाल्याचा आर्शिवाद घेऊन यंदा गोविंदा-गोपिकांनी निराश न होता रक्तदान, आरोग्य तपासण्या, सॅनिटायझर-मास्क वाटप, अँटीजन चाचण्या असे विविध उपक्रम हाती घेतले आहेत. दहीहंडी समन्वय समितीने राज्य रक्त संक्रमण परिषदेसोबत बैठक घेऊन रक्ताच्या तुटवड्याविषयी सकारात्मक निर्णय घेत रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. मुंबईत ठिकठिकाणी रक्तदान शिबिरे होत आहेत.