Coronavirus: देशातील कोरोनाचा मृत्यूदर जागतिक दरापेक्षा कमी; राज्य सरकारचा अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 01:27 AM2020-04-03T01:27:13+5:302020-04-03T06:42:03+5:30
महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे प्रमाण ३.७५ टक्के
- खुशालचंद बाहेती
औरंगाबाद : जगभरात कोरोनाचे थैमान चालू असतानाच भारतातील कोरोनाच्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण जागतिक प्रमाणापेक्षा कमी असल्याचे निष्कर्ष राज्य शासनाच्या अभ्यासात आढळून आले आहे. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि द्रव्य विभागाने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कोरोनाविषयक माहितीच्या आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीचे विश्लेषण करणारा अहवाल नुकताच सादर केला आहे.
राज्यात कोरोनाची लागण झाल्याचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर दवाखान्यात दाखलकरण्यात आलेल्या रुग्णांपैकी 86% रुग्णांमध्ये आता कोरोनाची लक्षणे दिसून येत नाहीत, म्हणजेच ते बरे होण्याच्या मार्गावर आहेत.12% रुग्णांमध्ये अद्याप ही लक्षणे आहेत.02% रुग्ण मात्र, अत्यवस्थ आहेत.
या अहवालाप्रमाणे कोरोनाच्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण जागतिक पातळीवर 4.84%आहे. याउलट भारतात हे प्रमाण 2.59%आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांचे मृत्यूचे प्रमाण मात्र 3.75%इतके आहे. ही मात्र राज्याच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे.
61 ते ७० वयोगटातील लोकांचे महाराष्ट्रात या रोगांमुळे सर्वाधिक मृत्यू (२०%) झाले आहेत. कोरोनाची लागण होण्याचे सर्वाधिक प्रमाण ३१ ते४० या वयोगटात असले तरीही या वयोगटातील ४६ बाधित व्यक्तींपैकी फक्त १ चा मृत्यू झाला आहे.
41 ते ५० वयोगटातील ४४ आणि ५१ ते ६० या वयोगटातील २८ रुग्णांपैकी प्रत्येकी एकाचाच मृत्यू झाला आहे. नुकत्याच धारावीत झालेल्या नवजात शिशूचा मृत्यू वगळता ३० वर्षे वयापर्यंतच्या एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.